सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ही अफवा ऐकताच उदित नारायण यांचे चाहतेही चिंतेत पडले होते. पण त्यांनी प्रकृती खरंच बिघडली का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सतत होणाऱ्या या चर्चांबाबत उदित नारायण यांच्या मॅनेजरने स्पष्टीकरण दिलं. त्यांना हृदय विकाराचा झटका आला नसल्याचंही मॅनेजरने सांगितलं. आता स्वतः उदित नारायण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले उदित नारायण?
‘आजतक’शी उदित नारायण यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “दसऱ्याच्यानिमित्त माझ्या प्रकृतीबाबत अशा प्रकारची अफवा पसरवण्यात आली. यामुळे माझं आयुष्य आणखीनच वाढलं. जी व्यक्ती इतकी हसते त्याला हृदय विकाराचा झटका कसा येऊ शकतो? ही अफवा का? आणि कोणी? पसरवली असेल.”
ते पुढे म्हणाले, “माझी प्रकृती कशी आहे हे विचारण्यासाठीही मला अनेक फोन येत होते. मी माझ्या फॅमिली ग्रुपवरदेखील माझा आताचा व्हिडीओ शेअर करत ठिक असल्याचं नातेवाईकांना सांगितलं. अशाप्रकारच्या अफवांचा माझ्यावर कोणताच परिणाम होत नाही. पण माझ्या कुटुंबातील मंडळींना यामुळे त्रास झाला.” उदित नारायण आणि त्यांच्या कुटुंबियांना या अफवांमुळे खूप त्रास सहन करावा लागला.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
उदित नारायण यांची तब्येत ठीक आहे. त्यांना काहीही झालेलं नाही. ट्विटरवर अशा प्रकारचे मेसेज आणि वृत्त व्हायरल झाल्यानंतर आपलं त्यांच्याशी बोलणं झालं असून तेसुद्धा या अशा वृत्तांमुळे त्रासले आहेत असं उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा या चर्चा खोट्या असल्याचं उदित नारायण यांनी स्पष्ट केलं आहे.