‘8AM मेट्रो’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून याचे दिग्दर्शन राज राचकोंडा यांनी केले आहे. हा चित्रपट दैनंदिन जीवनाशी निगडित अर्थात ह्यूमन कनेक्शनवर आधारित आहे, असे आपल्याला ट्रेलर पाहून समजते. गुलशन देवैया आणि सयामी खेर हे दोन कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यांच्यासह मराठी अभिनेता उमेश कामतसुद्धा ‘8AM मेट्रो’ चित्रपटात प्रेक्षकांना महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.
हेही वाचा : ‘त्या’ चुकीमुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले असते; प्रियांका चोप्राने केला खुलासा
उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘8AM मेट्रो’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. “‘8AM मेट्रो’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत विशेषत: गुलशन देवैया, सयामी खेर आणि दिग्दर्शक राज राचकोंडा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव छान होता,” असे उमेशने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
‘8AM मेट्रो’ या चित्रपटात दोन अनोळखी व्यक्तींची कथा मांडण्यात आली आहे. या दोघांची पहिली भेट ८ वाजता सुटणाऱ्या मेट्रोमध्ये होते आणि दोघेही एकाच मेट्रो डब्यातून प्रवास करीत असतात. सुरुवातीला दोघे अनोळखी असतात परंतु कालांतराने त्यांच्यात कशी मैत्री होते आणि पुढे कौटुंबिक जबाबदारीचे काय? या विषयावर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असे ट्रेलरमधून स्पष्ट होते. अभिनेता उमेश कामत यात नायिकेच्या पतीची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा : सत्तेसाठी अंतिम लढा, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘8AM मेट्रो’ १९ मे २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून सिनेमात तुम्हाला कवी गुलजार यांच्या कवितासुद्धा ऐकायला मिळतील.