अभिनेता विकी कौशल याचे नाव बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत सामाविष्ट आहे. अभिनय क्षेत्रातील कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज विकीचा वाढदिवस आहे. आतापर्यंत त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. पण एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला अटक झाली होती.
विकी कौशलने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो शूटिंगदरम्यानचे अनुभव चाहत्यांशी नेहमीच शेअर करताना दिसतो. पण काही वर्षांपूर्वी त्याच्या अशाच एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली होती. हा किस्सा अनुराग कश्यपने एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.
आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित
सुपरहिट झालेल्या ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाचा विकी कौशल साहाय्यक दिग्दर्शक होता. तर अनुराग कश्यपने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनुराग कश्यपने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितले होते, “आम्ही परवानगीशिवाय कुठेही शूटिंग करत असू. आमच्याकडे पोलीस किंवा स्थानिक अधिकाऱ्यांची लेखी परवानगी नव्हती. एकदा आम्ही शूटिंग करत असताना एक माफिया टोळी खरोखरच वाळूची तस्करी करत होती. आम्ही त्याचे शूटिंग करत होतो. पण याच दरम्यान पोलिसांनी विकीला पकडले होते.”
दरम्यान, ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ हा चित्रपट तुफान हिट झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी, पीयूष मिश्रा, हुमा कुरेशची, रिचा चड्ढा अशी तगडी स्टारकास्ट होती. तर आता आगामी काळात विकी ‘सॅम बहादूर’ आणि ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.