अभिनेता विकी कौशल बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनय आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर त्याने कलाविश्वात अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. २०१५ साली मसान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकीने राझी, उरी, सरदार उधम चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आणि कायमच चर्चेत राहणाऱ्या विकी कौशलचा एक जुना फोटो सध्या व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानबरोबरचा ‘अशोका’ चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. विकीचे वडील शाम कौशल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. फोटोमध्ये विकी आणि शाहरुखबरोबर दिग्दर्शक विष्णू वर्धनही दिसत आहे. “२००१ साली अशोका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फिल्म सिटीमध्ये घेतलेला हा फोटो आहे. विकी तेव्हा आठवीत होता आणि विष्णू वर्धन चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होता. विकी अभिनय क्षेत्राची वाट धरेल, हे कोणालाच ठाऊक नव्हतं. पण आज २०२२मध्ये विकीला ‘शेरशाह’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि विष्णूला सरदार उधमसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. देवाचे आशीर्वाद आणि नशीब”, असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा >> ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाच्या लूकनंतर आता पोस्टरची चर्चा, अॅनिमेशन स्टुडिओकडून कॉपी केल्याचा दावा
हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
विकीच्या वडिलांनी शेअर केलेल्या या फोटोने चाहत्यांचं लक्षही वेधून घेतलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “या मुलाचं कतरिना कैफशी लग्न होईल, हा विचारही कोणी केला नसेल”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं “कतरिना कैफचा हा नवरा होईल, असंदेखील कोणाला वाटलं नसेल”, अशी कमेंट केली आहे.
हेही पाहा >> Video : बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवणाऱ्या किली पॉलसह माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. कतरिना-विकीने डिसेंबर २०२१मध्ये विवाहबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली.