सिनेसृष्टीत काम मिळविण्यासाठी नवख्या कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. कलाक्षेत्रातील कौटुंबीक पार्श्वभूमी नसेल तर अनेकांचा या इंडस्ट्रीत निभाव लागत नाही. यामुळे काही कलाकार आपली स्वप्न पूर्ण न करताच सिनेसृष्टी सोडतात, तर काही मात्र वाटेत येईल ते काम करून, संघर्ष करून काम मिळवतात. आज अशाच एका अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्याचं नाव विपीन शर्मा आहे.
विपीन शर्मा यांना तुम्ही ‘तारे जमीं पर’, ‘पान सिंग तोमर’, ‘बेबाक’, ‘इन्कार’, ‘हड्डी’, ‘एक ही बंदा काफी है’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. विपीन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. एकवेळ अशी होती की त्यांना चहा व चित्रपटाची तिकीटं विकावी लागली होती. ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना त्यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. तसेच मनोज बाजपेयी त्यांचे चांगले मित्र असल्याचा खुलासाही त्यांनी केला.
विपीन शर्मा म्हणाले, “एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) सोडल्यानंतर मी अभिनय करायला सुरुवात केली, पण मला वाटलं की मी अभिनेता नाही. मी अनेक नाटकांमध्येही काम केलं. नंतर बराच काळ मी अभिनयापासून दुरावलो. पण मग मी याबद्दल खोलवर विचार केला आणि आता फक्त अभिनय करेन, असा निर्णय घेतला. हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमचा थिएटर ग्रुप बॉक्स ऑफिसच्या बाहेर चहा विकायला आणि तिकीटं विकायला बसायचा. पण मागच्या बऱ्याच काळापासून मी दिल्लीला गेलो नाही आणि एनएसडीच्या संपर्कातही नाही.”
विपीन सध्या मनोज बाजपेयी यांच्याबरोबर ‘भैयाजी’ चित्रपटात काम करत आहेत. “मी एनएसडीपासून मनोज बाजपेयीला ओळखतो. त्याने बॅरी जॉनबरोबर एक नाटक केलं होतं, त्यासाठी मी लाइट डिझाइन केले होते. आम्ही तेव्हापासूनच जवळचे मित्र आहोत. यामुळे प्रत्येक वेळी त्याच्यासोबत काम करताना आनंद होतो,” असं विपीन म्हणाले.