अंतराळवीर सुनीता विल्यम्स(Sunita Williams) यांनी नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर त्या आज पृथ्वीवर परतल्या आहेत. सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते. आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात (International Space Station) दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते. मात्र, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकातच घालवावे लागले. आता मात्र सुनीता विल्यम्स परतल्यानंतर जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यामध्ये मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.

“प्रिय सुनीता विल्यम्स…”

अभिनेता आर. माधवन, जॅकी श्रॉफ, चिंरजीवी, मानुषी छिल्लर या कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर सुनीता विल्यम्ससाठी खास पोस्ट शेअर करीत आनंद व्यक्त केला आहे. तसेच सुनीता विल्यम्स यांचे कौतुकही केले आहे. आर. माधवनने त्याच्या सोशल मीडियावर सुनिता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतल्याचा एक व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “प्रिय सुनीता विल्यम्स, पृथ्वीवर तुझे पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळाले. तुला सुरक्षित व हसतमुख पाहून आनंद झाला. अंतराळात अनिश्चित २६० हून अधिक दिवस घालवणे, ही देवाची कृपा आहे. लाखो लोकांच्या प्रार्थनांना उत्तर मिळाले आहे.” पुढे आर माधवनने नासा व स्पेस एक्सला टॅग करत संपूर्ण टीमने उत्तम काम केल्याचे म्हटले.

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी एक्स अकाउंटवर एक फोटो शेअर करीत सुनीता विल्यम्स यांचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “अंतराळात नऊ महिने राहण्यासाठी संयम, लवचिकता आणि शोधाची वृत्ती ही गरजेची असते.” असे लिहिल्यानंतर त्यांनी सुनीता विल्यम्स यांना टॅग केले. याबरोबरच चिरंजीवी यांनीसुद्धा एक्सवर सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, “सुनिता विल्यम्स व बुच विल्मोर पृथ्वीवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. अशा प्रकारे घरी परतणे हे ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे. आठ दिवसांसाठी अंतराळात गेला आणि २८६ दिवसांनी पृथ्वीभोवती ४,५७७ प्रदक्षिणा घालून परतला”, असे म्हणत चिरंजीवी यांनी या अंतराळवीरांचे कौतुक केले आहे. पुढे त्यांनी अंतराळवीरांचा हा प्रवास, हा थ्रीलर असून आतापर्यंतची सर्वात मोठी साहसी कथा आहे असे म्हटले. मानुषी छिल्लरनेदेखील पोस्ट शेअर करत सुनीता विल्यम्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुनीता विल्यम्स यांच्यासारख्या महिलांकडे प्रेरणा म्हणून कायम पाहिले पाहिजे असे लिहिले.

आर. माधवन इन्स्टाग्राम पोस्ट

याबरोबरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने इन्स्टाग्रामवर सुनीता विल्सम्स व बुच विल्मोर यांचा अंतराळातील एक फोटो शेअर केला. त्या फोटोखाली सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांना टॅग करीत लिहिले, “अंतराळातील तुमचा प्रवास हा तुमच्या शक्ती व समर्पणाची परीक्षा होती, तुम्ही इतिहास निर्माण केला आहे. तुम्ही जे मिळवलं आहे, त्यावर आम्हाला अभिमान आहे. तुम्ही आम्हाला असेच प्रेरित करत राहण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा”, असे लिहित अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

रकुल प्रीत सिंग इन्स्टाग्राम

दरम्यान, आर. माधवनच्या कामाबाबत बोलायचे तर नुकताच तो ‘हिसाब बराबर’मध्ये दिसला होता. आता यानंतर तो ‘दे दे प्यार दे २’, ‘धुवाँधार’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे; तर जॅकी श्रॉफ ‘हाऊसफूल ५’मध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे; तर चिरंजीवी ‘विश्वंभरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ९ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader