मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री अदिती पोहनकरने अनेक वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. ‘आश्रम’मध्ये पम्मीची भूमिका करून तिने चाहत्यांची मनं जिंकली. अदितीने ‘आश्रम’मध्ये अभिनेता बॉबी देओलबरोबर इंटिमेट सीन्स केले आहेत. या सीनच्या शूटिंगबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिया टुडे डिजिटलशी बोलताना अदितीने इंटिमेट सीनच्या शूटिंगसंदर्भात मत व्यक्त केलं. असे सीन शूट करताना कलाकारांचा एकमेकांवर विश्वास असणं आवश्यक असतं, असं ती म्हणाली. “इंटिमेट सीन करणं अवघड आहे, कारण ते करताना दोन्ही कलाकार कंफर्टेबल असावे लागतात. इम्तियाज सरांनी मला एकदा सांगितले होते की अशा दृश्यांमध्ये अभिनेत्यांना जास्त काम करावं लागतं,” असं अदिती म्हणाली.
असे सीन करताना दोन कलाकारांमध्ये संवाद असायला हवा, असं अदितीने नमूद केलं. “तुम्ही विचारता, ‘काही चूकतंय का? तुम्ही ठीक आहात का?’ आणि सोबतच्या व्यक्तीला सुरक्षित वाटत असल्याची खात्री करा. अशा प्रकारे आम्ही ‘शी’ व ‘आश्रम’मधील सीन शूट केले. ‘आश्रम’मधील आमचा बाँड खूप मजबूत होता. सीन नीट झाला नाही आणि कट करावा लागला तर आम्ही पोझिशन बदलायचो नाही. त्या सीनमध्येच काही क्षण एकमेकांशी बोलून सगळं नीट असल्याची खात्री करायचो,” असं अदिती म्हणाली.
अदितीने सांगितलं की त्यावेळी त्यांच्याकडे सेटवर इंटिमसी कोऑर्डिनेटर नव्हते. “इंटिमसी कोऑर्डिनेटर असतात अशी संकल्पना अस्तित्त्वात आहे हे मला माहीत नव्हतं. पण मला असं वाटतं की दोन कलाकारांमध्ये जितकं जास्त अंतर असेल तितकं ते पडद्यावर विचित्र दिसेल. एकमेकांशी बोलणं, संवाद साधून कंफर्टेबल होणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कलाकारांमध्ये भावनिक अंतर नसते, तेव्हाच असे सीन उत्तमरित्या करता येतात,” असं अदिती म्हणाली.
कलाकारांना एकमेकांबरोबर सुरक्षित वाटणं महत्त्वाचं – अदिती
केमिस्ट्रीबद्दल अदिती म्हणाली, “असे सीन किती खरे वाटतात, यातच त्याचे सौंदर्य असते. असे सीन करताना जेव्हा दोन्ही कलाकारांना एकमेकांबरोबर सुरक्षित वाटतं तेव्हा ते सीन उत्तमरित्या होतात. असे सीन करताना दोन्ही कलाकारांना मर्यादा माहीत असते, त्यामुळे ते ती मर्यादा उलंडत नाही आणि मर्यादा ओलांडायलादेखील नको. अभिनेत्री किंवा अभिनेत्याला असे सीन करताना भीती वाटायला नको. जेव्हा एकमेकांवर विश्वास असतो तेव्हा ते स्क्रीनवर दिसून येतं. आमच्या शरीराला या सीनच्या मर्यादा समजतात आणि आम्ही त्याचा आदर करतो. असे सीन करताना सुरक्षिततेची भावनाच सर्वात महत्त्वाची असते.”
अदितीने बॉबीचं जेवण संपवलं
‘आश्रम’च्या चित्रीकरणादरम्यान बॉबीबरोबर ट्युनिंग कसं जमलं याबद्दल अदितीने सांगितलं. “मी त्यांचं सर्व जेवण संपवलं. बॉबी म्हणाला, ‘तू सगळा लिट्टी चोखा खाल्ला,’ आणि मी म्हणाले, ‘हो, खाल्ला.” अदितीने जेवण संपवल्यावर बॉबी देओलसाठी आलू टिक्की आणली. पण आलू टिक्की खूप मसालेदार होती. “मग मी म्हणाले, ‘ठीक आहे, मी आलू टिक्कीही खाईन’ आणि मी आलू टिक्की संपवली. या प्रसंगानंतर आमच्यातील ऑकवर्डनेस दूर झाला,” असं अदितीने सांगितलं.