शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाने नवे विक्रम नोंदवायला सुरुवात केली होती. तर आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूड स्टार्सनादेखील या चित्रपटाने भुरळ घातली आहे. अनेक कलाकार या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. आता ब्रह्मास्त्र रेकॉर्ड मोडणाऱ्या या पठाण चित्रपटाच्या कामगिरीबद्दल आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.
‘पठाण’ने प्रदर्शनाच्या सात दिवसांतच भारतातून ३०० कोटी तर जगभरातून ५५० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात कमी दिवसांमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच ‘बाहुबली १’च्या ॲडव्हान्स बुकिंगचा रेकॉर्ड मोडला होता. तर कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. यातील एक ‘ब्रम्हास्त्र’ही आहे. या चित्रपटाने जगभरातून ४२५ कोटींची कमाई केली होती. तर या चित्रपटाला मागे टाकत आता ‘पठाण’ने ५९१ कोटींची कमाई केली आहे. आता यावर आलिया भट्टने आनंद व्यक्त केला आहे.
आणखी वाचा : ‘पठाण’ची वाहवा होत असली तरी वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये ‘हा’ भारतीय चित्रपट आहे पहिल्या स्थानावर
काल आलिया भट्ट आणि वरुण धवन झी सिने ॲवॉर्ड्स २०२३ संबंधित एका कार्यक्रमात हजर होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना आलिया म्हणाली, “‘पठाण’ हा फक्त ब्लॉकबस्टर नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे आणि याचा मला खूप आनंद आहे. पठाणला जे यश मिळतंय ते पाहून मला खूप आनंद होतोय आणि मी देवाकडे प्रार्थना करते की यापुढेही असेच दिवस पाहायला मिळूदेत.”
‘पठाण’ने ‘ब्रह्मास्त्र’चाही रेकॉर्ड मोडला आहे याबाबत तिला प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “‘पठाण’ने ‘ब्रह्मास्त्र’चा रेकॉर्ड मोडला ही आनंदाचीच बाब आहे. मला वाटतं की प्रत्येकच चित्रपटाने आधीच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडायला हवा. तसं झालं तर सर्वांसाठीच ही एक आनंदाची गोष्ट असेल. जेव्हा ‘पठाण’ने ‘ब्रह्मास्त्र’चा रेकॉर्ड मोडला आहे मला कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला.”
हेही वाचा : ‘बेशरम रंग’मध्ये दीपिका पदुकोण…” गाण्याची पार्श्वगायिका शिल्पा रावचं वक्तव्य चर्चेत
दरम्यान ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानने ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. यामुळे शाहरुख खानचं हे पुनरागमन त्याचे चाहते एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरं करत आहेत.