करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘डब्बा कार्टेल’ चित्रपटामुळे अभिनेत्री अंजली आनंद घराघरांत लोकप्रिय झाली. ‘रॉकी और रानी…’ चित्रपटात अंजली आनंदने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिने नुकतीच एका पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगितला.
अभिनेत्री अंजली आनंद ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मी फक्त ८ वर्षांची होते… यापूर्वी मी ही गोष्ट कुठेच बोलले नाहीये. ही घटना माझ्या वडिलांच्या निधनानंतर घडली होती. मला माझ्या डान्स टिचरने सांगितलं, तो माझ्या वडिलांसारखा आहे. मी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला कारण, फक्त ८ वर्षांच्या मुलीला काय कळणार आहे… मग त्याने हळुहळू सुरुवात केली. आधी माझ्या गालावर किस केलं, त्यानंतर ओठांवर किस केलं आणि म्हणाला, ‘वडील असेच करतात’… त्यावेळी एका वडील आणि मुलीचं नातं कसं असतं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. कारण, मला खेळणी, चॉकलेट वगैरे हवं असेल किंवा आणखी काही हवं असेल तर तो मला द्यायचा.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “हे सगळं अनेक वर्षे सुरू होतं. तो मला केस मोकळे ठेवायला द्यायचा नाही. मला मुलींसारखे कपडे घालायची परवानगी नव्हती. मी त्याचे जुने कपडे, त्याचे जुने शर्ट घालायची. जेणेकरून कोणत्याच मुलाने माझ्याकडे पाहू नये अशी त्याची अपेक्षा होती. यादरम्यान माझ्या बहिणीचं लग्न झालं. तेव्हा माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा माझ्या बहिणीच्या लग्नाला आला होता. त्याला माझ्यावर क्रश होता. मग, त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तेव्हा मला खूप बरं वाटलं…”
“ज्यावेळी माझ्या डान्स टिचरला समजलं की मी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आहे, त्यावेळी त्याने माझ्यावर अधिक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मेसेज ट्रॅक करायचा, मला शाळा सुटताना घ्यायला यायचा आणि मी बाहेर जाऊ नये म्हणून शिक्षकांनाही घरी शिकवणी घ्यायला बोलवायचा. कोणालाच समजत नव्हतं मी नेहमी त्याच्या घरी का असते? वयाच्या आठव्या वर्षापासून ते मी १३-१४ वर्षांची होईपर्यंत हे सगळं सुरू होतं. माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडने मला या सगळ्यातून बाहेर काढलं…कारण, हे सगळं मी कोणालाच सांगू शकत नव्हते, माझ्यात कसलीच हिंमत नव्हती. मी त्याचे ( पहिला बॉयफ्रेंड ) मनापासून आभार मानते त्याच्यामुळे मी त्या माणसापासून वाचले आणि त्या भयंकर दलदलीतून बाहेर पडले.” असा धक्कादायक अनुभव अंजली आनंदने सांगितला.