अभिनेत्री भूमिका चावलाने सलमान खानबरोबरच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. नंतर बराच काळ अभिनय क्षेत्रापासून दूर असलेल्या भूमिकाने आता सलमान खानचाच चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले. भूमिका चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी भावना व्यक्त केल्या. सुशांतच्या मृत्यूने भूमिकाला मोठा धक्का बसला होता. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात भूमिकाने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तसेच सुशांतबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता याबाबतही तिने सांगितले आहे.
हेही वाचा- ‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी; आठवडाभरात १०० कोटींचा आकडा गाठण्यात अपयश
सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीदरम्यान भूमिका चावला म्हणाली, ‘सुशांत खूप सुंदर व्यक्ती होता. तो जमिनीशी जोडलेला माणूस होता. ‘एम. एस. धोनी…’ या चित्रपटासाठी आम्ही रांचीमध्ये शूटिंग केले होते. तो त्याच्या आयुष्याविषयी आणि इतर अनेक गोष्टींबद्दल बोलत असे. त्या वेळी माझा मुलगा साधारण एक वर्षाचा होता. मी शूटिंगदरम्यान सुशांतच्या गप्पा ऐकत बसायचे,” असे भूमिका म्हणाली.
सुशांतच्या मृत्यूबद्दल जेव्हा भूमिकाला कळले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. भूमिका म्हणाली, हे कोविडच्या वेळी घडले. मी त्या वेळी मुंबईत नव्हते. पहिला मेसेज आला तेव्हा माझा विश्वासच बसेना. मी जेव्हा व्हॉट्सअॅप उघडले तेव्हा त्यात मेसेज भरले होते. मी गुगल केले. या घटनेतून मी बराच काळ सावरू शकले नाही. “सुशांत खूपच तरुण होता आणि दुर्दैवाने तो बऱ्याच वादांमध्ये अडकला होता, त्यामुळे त्याच्या निधनाने माझ्यावर खूप परिणाम झाला. कुणी म्हणाले की, तो एकटा होता, कुणी म्हणाले की, तो नैराश्यात होता. मला माहीत नाही की नेमके काय झाले होते,” असे ती म्हणाली.
हेही वाचा-“मी तिला खूप वेळा गमावणार होते”; लेक मालतीबद्दल प्रियांका चोप्राचा खुलासा, म्हणाली, “ती १०० दिवस…”
भूमिका चावलाने ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता, ज्यात सुशांतने क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाने बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता.