‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अलीकडेच गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. अभिनेत्रीने १० मे रोजी मुलाला जन्म दिला. आता आपल्या बाळाचे नाव सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत या दोघांनी जाहीर केले आहे.
गौहर आणि जैद या जोडप्याने बाळाचे नाव ‘झेहान’ असे ठेवले आहे. आपल्या बाळाची पहिली झलक शेअर करताना गौहर लिहिते की, “तुम्ही सर्वांनी दिलेले आशीर्वाद आणि प्रेम याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते, आमच्या बाळाच्या पाठीशी असेच कायम राहा.” गौहरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
गौहर खान आणि जैद दरबार २०२० मध्ये विवाहबंधनात अडकले होते. गेल्यावर्षी डिसेंबर २०२२ मध्ये गौहरने गरोदर असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. १० मे २०२३ रोजी वयाच्या ३९ व्या वर्षी गौहर खानने एका गोड मुलाला जन्म दिला. या बाळाला १ महिना पूर्ण झाल्यावर त्याचे नाव जाहीर करण्यात आले. गौहरच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, गौहर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले आहे. ती तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असते. गौहर खानने नुकतीच नेटफ्लिक्सवरील ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.