दक्षिणात्य, चित्रपट, मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जिनिलीया देशमुख. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पुनरागमन करत मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकलं. लग्न झाल्यानंतर अनेक वर्ष ती मनोरंजन सृष्टीपासून दूर राहिली. आता तिने असं का केलं याचा खुलासा तिने केला आहे.
रितेश आणि जिनिलीया नुकतेच करीना कपूरच्या चॅट शो ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमामध्ये त्या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. लग्न झाल्यानंतर रितेशने जिनिलीयाला काम करण्यासाठी मनाई केली होती असं काही वर्षांपूर्वी बोललं जात होतं. आता जिनिलीयानेच खरं काय ते सांगितलं.
आणखी वाचा : Video: फोटोग्राफरने सर्वांसमोर ‘वहिनी’ हाक मारताच जिनिलीयाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
ती म्हणाली, “लग्नाआधी मी हिंदी, तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत खूप काम करत होते. लग्न झाल्यानंतर मला लग्नाला प्राधान्य द्यायचं होतं आणि तो पूर्णपणे माझा निर्णय होता. लग्नानंतर जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा लोकांनी मला विविध प्रश्न विचारले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली, असं अनेकांनी गृहीत धरलं. पण तसं काहीही झालं नाही. तुला चित्रपटांमध्ये काम करायला रितेशने मनाई केलीये का? असा प्रश्न मला विचारला गेला. तेव्हा दरवेळी एकच उत्तर द्यायचे की, नाही. मलाच दीर्घकाळ मनोरंजन सृष्टीपासून ब्रेक घ्यायचा आहे.”
त्यावर रितेश म्हणाला, “कामातून ब्रेक घेणं हा सर्वस्वी तिचा निर्णय होता. तिला यापूर्वीच पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करायचं होतं पण करोनामुळे ते लांबलं. मी तिला अनेकदा सांगायचो की तुझं कॅमेऱ्यासमोर असणं तू मिस करत आहेस त्यामुळे तू काम करायला सुरुवात कर.” आता जिनिलीया आणि रितेशचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.