शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट जवान नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक हिने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तरी या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलं होतं याचा खुलासा केला आहे.
चित्रपट शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने निर्मित केला आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी मोठा खर्च केला गेला आहे. अनेक महिने या चित्रपटाबाबत गुप्तता बाळगली गेली होती. या चित्रपटात नक्की काय दिसणार आहे कोणालाच माहित नव्हतं. तर आता सौमित्र पोटेच्या युट्युब चॅनेलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमामध्ये गिरीजाने या चित्रपटाबाबत गुप्तता का बाळवली गेली आणि त्या संदर्भात कॉन्ट्रॅक्टमध्ये काय अट ठेवली गेली होती हे सांगितलं आहे.
या चित्रपटाबाबत तिला प्रश्न विचारला गेल्यावर ती म्हणाली, “आम्हाला या चित्रपटाबद्दल काहीच सांगण्याची मुभा नाहीये. आमच्याकडून या चित्रपटाच्या करारामध्ये लिहून घेतलं आहे की कुठेही काहीही बोलू नका. इतकंच नाही तर अधून मधून आम्हाला याची आठवण करून देण्यासाठी ते याबद्दल ईमेलही पाठवतात. मी गेली दोन वर्ष टप्प्याटप्प्यात या चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि आतापर्यंत मी काही न केलेल्या गोष्टी या चित्रपटात करताना दिसणार आहे. मला या चित्रपटात ॲक्शन ही करायची होती. तर या चित्रपटातून तुम्हाला एक वेगळा अंदाज पाहायला मिळेल.”
पुढे ती म्हणाली, “या चित्रपटाबद्दल इतकी गुप्तता बाळगण्याचे मुख्य कारण म्हणजे आजकाल पायरसीचं प्रमाण खूप वाढलं आहे. आम्हाला डबिंग करतानाही खरे सीन्स दाखवले नाहीत. आमच्या सेटवरून शाहरुख खानचे जवान चित्रपटातील काही फोटो लीक झाले होते. तेव्हा ते खूप काही झालं. प्रमुख कास्ट वगळता बाकीच्यांना सेटवर फोन आणण्याची बंदी होती.”
दरम्यान शाहरुख खानचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. तर यातील गिरीजाच्या कामातही प्रेक्षक सोशल मीडियावरून कौतुक करत आहेत.