शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला. यामध्ये शाहरुख खानबरोबरच या चित्रपटातील इतर स्टारकास्टचीही झलक दिसली. तर या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ती यात कोणत्या भूमिकेत दिसणार हे आता समोर आलं आहे.
काही महिन्यांपूर्वी ‘जवान’ या चित्रपटाचं एक मोशन पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्या पोस्टरमध्ये शाहरुख खानच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या दिसत होत्या. ते पोस्टर शेअर करत गिरीजाने ती या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे ती या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक होते. आता हे गुपित उलगडलं गेलं आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
आज प्रदर्शित झालेल्या ‘जवान’च्या प्रिव्ह्यू व्हिडीओमध्ये गिरीजाची झलक पाहायला मिळाली. या चित्रपटात तिची अगदी वेगळी भूमिका आहे. अशा प्रकारची भूमिका गिरीजाने याआधी साकारलेली नाही. या चित्रपटातील शाहरुख खानच्या टीममध्ये आहे. या चित्रपटात ती ॲक्शन करतानाही दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रिव्ह्यू व्हिडीओमध्ये ती बंदूक चालवताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण
दरम्यान, अटली दिग्दर्शित हा बहुप्रतीक्षित चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुख खानबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसेल, तर दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. याचबरोबर या चित्रपटात दीपिका पदुकोण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.