Hina Khan : ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान. या मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वातून हिनाने मोठा चाहता वर्ग कमावला. सध्या ही अभिनेत्री कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतीच गूगलने जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत हिना खानचंही नाव आहे.

हिनाचं नाव या यादीत आल्याने सोशल मीडियावर सध्या ती चर्चेत आली आहे. अनेक चाहते तिला यासाठी शुभेच्छा देत आहेत. मात्र, आपलं नाव गूगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत आल्याने हिना खान काहीशी नाराज आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत मनातील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने शेअर केला शूटिंगचा व्हिडीओ; म्हणाली…

हिनाने गूगलवर टॉप १० सर्वाधिक सर्च केलेल्या अभिनेत्यांच्या यादीचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावर लिहिलं आहे, “गूगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत माझं नाव आल्याने अनेक व्यक्ती, चाहते माझं अभिनंदन करत आहेत. पण, प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्यासाठी ही कोणतीही मोठी अभिमानास्पद आणि गर्वाची गोष्ट नाही.”

हिनाने पुढे देवाकडे यासाठी एक प्रार्थना करत लिहिलं, “कोणत्याही व्यक्तीला तिच्या आजाराचे निदान झाल्याने गूगलवर सर्वाधिक सर्च केले जाऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. माझ्या या कठीण काळात अनेकांनी मला साथ दिली, त्यांचे मी नेहमीच कौतुक करते. पण, मला असं वाटतं की, मला माझ्या कामासाठी, मी मिळवलेल्या यशासाठी लोकांनी मला सर्च करावं”, अशी इच्छा तिने पुढे व्यक्त केली आहे.

हिना खानने या वर्षाच्या मध्यात एक पोस्ट शेअर करीत सांगितलं होतं की, ती स्टेज-३ स्तनाच्या कर्करोगाचा सामना करत आहे. त्यानंतर तिने या आजारावर उपचार घेतानाच्या अनेक अपडेट्स चाहत्यांसह शेअर केल्या. हिनाला कर्करोगासारखा भयंकर आजार असूनही तिने तिच्या कामातून मोठा ब्रेक घेतलेला नाही. ती अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे.

हेही वाचा : ‘हा’ दाक्षिणात्य सुपरस्टार साकारू शकतो शक्तिमानची भूमिका, मुकेश खन्ना यांनी मांडले मत; म्हणाले, “त्याच्यात ती…”

हिनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती २००८ मध्ये सुरुवातील ‘इंडियन आइडल’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये तिची पहिली मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात तिने अक्षरा हे पात्र साकारलं. याच मालिकेने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. पुढे ‘बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर तिने ‘कसौटी जिंदगी की’, ‘नागिन ५’ अशा काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

Story img Loader