Jacqueline Fernandez Mother Passed Away : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या आईचं निधन झालं आहे. जॅकलीनच्या आई किम या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आईची काळजी घेण्यासाठी जॅकलीनने नियोजित सगळे कार्यक्रम रद्द केले होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान किम यांनी अखेरचा श्वास घेतला.
जॅकलीन फर्नांडिसची आई किम यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांना २४ मार्च रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या १३ दिवसांपासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. जॅकलीन आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनली परफॉर्म करणार होती. मात्र, अभिनेत्रीला तिच्या आईच्या तब्येतीबद्दल कळताच ती सर्व काही सोडून गुवाहाटीवरून मुंबईत परत आली होती.
जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचं रविवारी उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती अभिनेत्रीच्या टीमने ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिली आहे. पण, फर्नांडिस कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही निवेदन समोर आलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, किम यांना यापूर्वीही हार्ट स्ट्रोकचा ( हृदयविकाराचा झटका ) आला होता. त्यावेळी २०२२ मध्ये त्यांना बहरीनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे होणाऱ्या आयपीएल समारंभात (आयपीएल २०२५) जॅकलीन फर्नांडिस परफॉर्म करणार होती. पण, आईच्या तब्येतीच्या कारणास्तव ती मुंबईत परतली. जेव्हा अभिनेत्रीच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा, सलमान खान देखील तिला भेटायला गेला होता.
जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती शेवटची सोनू सूदसोबत ‘फतेह’ चित्रपटात दिसली होती. आता लवकरत ती अजय देवगणबरोबर ‘रेड २’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘वेलकम ५’ मध्ये झळकणार आहे.