Prateik Babbar Priya Banerjee Wedding : दिवंगत स्मिता पाटील यांचा मुलगा, अभिनेता प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी शुक्रवारी (१४ फेब्रुवारीला) दुसरं लग्न केलं. पण त्याने बब्बर कुटुंबाला लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. सावत्र भावंडांनाच नाही तर त्याने वडील राज बब्बर यांनाही लग्नात बोलावलं नाही, असा खुलासा आर्य बब्बरने केला. आता यावर प्रतीकची सावत्र बहीण जुही बब्बरने प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतीकने लग्नात बोलावलं नाही, याबद्दल आर्यने प्रतिक्रिया दिली होती. त्याला कोणीतरी कुटुंबापासून दूर राहायला सांगतंय, त्याने माझ्या आईला लग्नात न बोलावणं समजू शकतो, पण वडिलांनाही बोलावलं नाही, असं म्हणत आर्यने नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल जुही म्हणाली, “मी आर्यची बाजू घेत नाहीये, कारण तो दुखावला गेला आहे. जेव्हा कोणीही दुखावलं जातं तेव्हा त्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हा एक संवेदनशील विषय आहे. प्रतीक माझा भाऊ आहे आणि जगातली कोणतीही गोष्ट हे सत्य बदलू शकत नाही. आम्ही एकाच बापाची अपत्ये आहोत हीदेखील वस्तुस्थिती आहे.”
प्रतीकच्या बायकोबद्दल जुही म्हणाली…
जुहीला वाटतं की प्रतीकच्या आजूबाजूच्या काही लोकांनी त्याला कुटुंबापासून दूर राहण्यास सांगितलं असावं. “सध्या त्याच्याभोवती काही लोक आहेत ज्यांचा त्याच्यावर प्रभाव पडला आहे. आम्हाला त्या लोकांची नावं घ्यायची नाहीत, त्याने या सगळ्यात अडकावं असं आम्हाला वाटत नाही; कारण यामुळे कोणाचाच फायदा होणार नाही. मी ‘सँडविच’ म्हणतेय पण त्याचा अर्थ प्रतीकची कुटुंब आणि प्रिया यांच्यामुळे ‘सँडविच’सारखी अवस्था झाली आहे, असं अजिबात नाही. प्रिया ही एक सुंदर मुलगी आहे. ती खूप नशीबवान आहे की तिला तिच्यावर प्रेम करणारा आणि समजून घेणारा जोडीदार मिळाला आहे,” असं जुही म्हणाली.
प्रतीकचं सावत्र आईबरोबर चांगलं बाँडिंग
जुही म्हणाली, “सर्वांना माहीत आहे की माझ्या आईने (नादिरा बब्बर) नेहमी प्रतीकची खूप काळजी घेतली आहे. त्या दोघांचं नातं खूप प्रेमळ आहे. काही लोकांना वाटतं की आम्ही प्रतीकच्या या खास दिवसात लक्ष वेधून घेण्यासाठी करतोय. त्याचे भाऊ, बहीण किंवा वडील पब्लिसिटी मिळवतील, असं वाटतं; पण तसं नाही. आमच्या भावाने आनंदी राहावं, हीच गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची आहे.”
प्रतीकच्या लग्नात सहभागी होऊ शकली नसली, तरी मनात राग नसल्याचं जुहीने सांगितलं. “त्याला पहिल्या लग्नात वाईट अनुभव आला, त्यामुळे आता त्याने दुसरं लग्न केलं आहे. ही मोठी गोष्ट आहे. आम्ही त्याच्यावर कोणताही दबाव आणू इच्छित नाही. लग्नात प्रत्येक कुटुंबात अशा गोष्टी होत असतात. त्याचं पहिलं लग्न आमच्यासाठी भव्य होते, आम्ही खूप नाचलो होतो. जेव्हा त्याचं ते लग्न मोडलं तेव्हा बाबा त्याच्या पाठिसी खंबीरपणे उभे राहिले होते. त्यांनी त्याला मदत केली होती,” असं जुहीने नमूद केलं.