‘आदिपुरुष’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. तर अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाला सर्वत्र विरोध जरी होत असला तरी या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेनॉन मात्र हा चित्रपट प्रेक्षकांनी पहावा म्हणून प्रयत्न करत आहे.
या चित्रपटात दाखवले गेलेली दृश्यं, यातील संवाद, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळेच या चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. अशातच ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’नेही या चित्रपटावर बंदी घालायची विनंती करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. या सगळ्या होणाऱ्या टीकेनंतर या चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान मौन बाळगून आहे. परंतु क्रिती सेनॉन या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री क्रिती सेनॉन ‘आदिपुरुष’ हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखवणार आहे. आज म्हणजेच २१ जूनला दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना ‘आदिपुरुष’ दाखवणार आहे. यादरम्यान तिचे कुटुंबही क्रितीसोबत असणार आहे. तिने यासाठी दिल्लीतील एका चित्रपटगृहात शो बुक केला आहे. या थिएटरमध्ये ३०० सीट आहेत. तर शोनंतर क्रिती विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहे. अद्याप क्रितीकडून याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : हनुमानानंतर ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांना आठवला महाभारतातील कर्ण, म्हणाले…
दरम्यान, चित्रपटगृहात प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’कडे पाठ फिरवली आहे. पहिले दोन दिवस चांगली कमाई करणार आहात चित्रपट खूप दर दिवशी ७० ते ८० टक्के कमी कमाई करताना दिसत आहे. आत्तापर्यंत जगभरातून या चित्रपटाने साडेतीनशेहून अधिक कोटींची कमाई केली आहे.