‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता हे तिने शेअर केलं आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये क्षितीचीही झलक दिसली. या चित्रपटाच्या निमित्ताने क्षितीला धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव खूप विलक्षण होता.
आणखी वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “या सर्वांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. करण जोहर खूप नम्र आहे. कामाच्या वेळी सेटवर शिस्तबद्ध वातावरण असायचं, पण इतर वेळी तितकीच मजा मस्तीही चालायची. रणवीर-आलिया सहकलाकार म्हणून खूप समजून काम करणारे आहेत. तितकेच ते साधे आणि नम्रही आहेत. याशिवाय सेटवरील ज्येष्ठ कलाकारांबरोबर वावरताना सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं. पण ही सगळी मंडळी ही खूप साधी आहेत.”
पुढे ती म्हणाली, “सेटवर धर्मेंद्रजी त्यांनी स्वतः लिहिलेली गझल आणि शेअर ऐकवायचे. जया बच्चन आणि शबाना आझमी मिळून छान गप्पा मारायच्या. जयाजींबाबत थोडं दडपण होतं पण त्यांच्याबरोबर छान बोलणी झाली. ही सर्व दिग्गज मंडळी त्यांच्या प्रसिद्धीचा कुठलाही आव न आणता प्रत्येक सीन सहकलाकारांशी चर्चा करून, सराव करून करायचे. ज्यांचं काम बघत आपण मोठे झालो आहोत त्यांच्याबरोबर अभिनय करण्याची संधी मिळणं आणि त्यांच्याबरोबर वावरायला मिळणं एक वेगळाच आनंद आहे.”
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं असून २८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.