Madhuri Dixit : बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची भुरळ आजही पडते यात काहीही शंका नाही. माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पंचक हा सिनेमा नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. काही दिवसांपूर्वीच माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा झाल्या होत्या. एवढंच नाही तर माधुरी दीक्षित भाजपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार अशीही चर्चा झाली होती. त्यावर आता माधुरी दीक्षित स्वतः आणि तिचे पती श्रीराम नेने या दोघांनीही मौन सोडलं आहे.
श्रीराम नेने काय म्हणाले?
माधुरी दीक्षितच्या राजकारण प्रवेशावर डॉ. श्रीराम नेने यांनीही भाष्य केलं. “रोल मॉडेल हे समाजाला दिशा दाखवत असतात. समाजात चांगल्या सुधारणा झाल्या तर भारत पहिल्या क्रमांकावर येईल. राजकारण हा आमचा पिंड नाही. आम्ही रोज नव्या नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे आम्हाला लोकांना मदत करायलाही आवडते.” असं श्रीराम नेनेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी हे वक्तव्य केलं आहे.
माधुरीने नेमकं काय म्हटलं आहे ?
“प्रत्येक निवडणूक आली की मला उत्तर द्यावं लागतं. पण निवडणूक लढवावी ही माझी महत्त्वाकांक्षा नाही. राजकारण हे माझं पॅशन नाही मी एक सर्जनशील व्यक्ती आहे. निवडणूक लढवणं ही माझी बकेटलिस्ट नाही, तर ती इतरांची आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मला कुठूनतरी उभं केलं जातं. ” मात्र मला राजकारणात काही रस नाही. असं माधुरीने स्पष्ट केलं आहे.
माधुरी दीक्षितच्या राजकारणातल्या प्रवेशावर, निवडणूक लढवण्यावर अनेकदा चर्चा रंगली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी या बातम्या खोट्या आणि काल्पनिक असल्याचं समोर आलं होतं. माधुरीच्या वक्तव्यामुळे सध्या तरी ती राजकारणात प्रवेश करणार नाही हे स्पष्ट झालं आहे. माधुरी दीक्षित भारतीय जनता पक्षात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात गडद झाल्या होत्या. मात्र आता तरी या चर्चांना पूर्णविराम लागेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.