‘करण अर्जुन’ फेम मराठमोळी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. तिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे. तिचे नावही बदलण्यात आले आहे. तिचे नवीन नाव यमाई ममता नंद गिरी आहे असे आहे. ममताने शुक्रवारी प्रयागराजमध्ये पिंड दान केले. सन्यास घेतल्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या ममता कुलकर्णीच्या कुटुंबात कोण कोण आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममताचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. ममताचं जन्माचं नाव पद्मावती कुलकर्णी आहे. तिचे कुटुंब मुंबईतील वर्सोवा भागत राहत होते. तिने मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला ममताला अभिनयात काहीही रस नव्हता, पण तिच्या आईने तिला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं, असं म्हटलं जातं.

रिपोर्ट्सनुसार, ममताच्या वडिलांचे नाव मुकुंद कुलकर्णी आहे. ममताला मिथिला व मुलिना या दोन बहिणी आहेत. तिची मोठी बहीण मुलिना कुलकर्णी १९९६ मध्ये अभिनेत्री झाली. तिने कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर ममताप्रमाणे तिनेही आपले नाव बदलून सौम्या कुलकर्णी असे नाव ठेवले. तिने ‘टाइम बॉम्ब’ आणि ‘सम्राट’ या चित्रपटांमध्ये काम केलं. मुलिनाचे लग्न संजय कदम यांच्याशी झालं. तिच्या सासरच्या मंडळींना लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करावं, हे मान्य नव्हतं; त्यामुळे ती अभिनयापासून दुरावली.

ममता कुलकर्णीचं तन्वी आझमी, सैयामी खेरशी नातं काय?

ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आझमी व ममता कुलकर्णी नात्यात एकमेकींच्या बहिणी आहेत. दोघींच्या आई चुलत बहिणी आहेत, असं म्हणतात. तन्वी आझमी या शबाना आझमींच्या वहिनी आहेत. अभिनेत्री सैयामी खेर ही ममता कुलकर्णीच्या चुलत भावाची मुलगी आहे. तन्वी आझमी, ममता कुलकर्णी आणि अद्वैत खैर ही नात्यात एकमेकांची भावंडं आहेत आणि सैयामी अद्वैत खेर यांची मुलगी आहे.

ममता कुलकर्णीचे फिल्मी करिअर

ममता कुलकर्णी ही ९० च्या दशकातील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. ममता कुलकर्णीने ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘नसीब’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘क्रांतीवीर’, ‘आंदोलन’, ‘छुपा रुस्तम’, ‘घातक’, ‘वक्त हमारा है’, ‘बाजी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ममताने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, बंगाली, मराठी चित्रपटसृष्टीत काम केले होते. ती शेवटची २००२ मध्ये ‘कभी तुम कभी हम’ मध्ये झळकली होती. सिनेविश्व सोडल्यानंतर ती दुबईला स्थायिक झाली. ड्रग्ज प्रकरणात नाव आलेल्या विकी गोस्वामीबरोबरच्या नात्यामुळे ममता खूप चर्चेत राहिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress mamta kulkarni was born in marathi brahmin family she is relative of tanvi azmi saiyami kher hrc