Mamta Kulkarni will Remain Mahamandaleshwar : उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. २५ वर्षांपूर्वी बॉलीवूड सोडणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभमेळ्यात संन्यास घेतला. त्यानंतर तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद देण्यात आले. पण तिला महामंडलेश्वर केल्यानंतर बराच वाद झाला होता. त्यानंतर तिला व तिला महामंडलेश्वर करणाऱ्या डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना व ममताला किन्नर आखाड्यातून काढल्याची घोषणा अजय दास यांनी केली. नंतर ममताने स्वतः या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आता ममता कुलकर्णीने तिचा नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. १ मिनिट १४ सेकंदाच्या व्हिडीओत तिने तिला महामंडलेश्वर करणाऱ्या डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची बाजू घेतली आहे. त्रिपाठींवर काही लोकांनी चुकीचे आरोप केले आहेत, त्यामुळे दु:ख झालं आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला, असं ममता म्हणाली.

ममताला तिचं महामंडलेश्वर पुन्हा देण्यात आलं आहे. ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पद मिळवण्यासाठी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप झाला होता. पण तिने २ लाख रुपये दिल्याची कबुली दिली. स्पष्टीकरण देत ममता म्हणाली, “महामंडलेश्वर झाल्यानंतर मी माझ्या गुरूंना जी भेट दिली होती ती छत्री, काठी आणि इतर वस्तूंसाठी होती. उरलेली रक्कम अन्नदानासाठी दिली होती. मी माझ्या गुरूंची आभारी आहे की त्यांनी मला पुन्हा हे पद दिलं. भविष्यात मी माझे जीवन किन्नर आखाडा आणि सनातन धर्माला समर्पित करेन.”

laxmi narayan tripathi mamta kulkarni kinnar akhara 2
ममता कुलकर्णी व डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (फोटो – इन्स्टाग्राम)

किन्नर आखाड्याच्या पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मण त्रिपाठी यांनी न्यूज १८ ला सांगितलं की ममता कुलकर्णी म्हणजेच यमाई ममता नंद गिरी किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहे आणि राहील. ममता कुलकर्णीने राजीनामा दिला असला तरी आम्ही राजीनामा स्वीकारलेला नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

किन्नर आखाड्याने २४ जानेवारी रोजी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पद दिलं होतं. त्यानंतर मोठा वाद झाला. शेवटी १० फेब्रुवारीला ममताने एक व्हिडीओ पोस्ट करून महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आणि किन्नर आखाड्याशी संबंध तोडत असल्याची घोषणा केली. मात्र आता ममताचा राजीनामा स्वीकारण्यास त्रिपाठींनी नकार दिला आहे. त्यामुळे ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर राहणार आहे.

Story img Loader