ऐश्वर्या राय बच्चन आणि सुश्मिता सेन या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. दोघींनीही १९९४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेतून आपला प्रवास सुरू केला होता. त्या काळी या दोघींमध्ये स्पर्धा होती, त्यामुळे त्यांच्यात वैर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याच स्पर्धेत टॉप १० स्पर्धकांपैकी एक व आता अभिनेत्री असलेली मानिनी डे हिने या दोघींबद्दल होणाऱ्या चर्चांमागचं सत्य सांगितलं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सुश्मिता सेनने स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं होतं, असा खुलासा मानिनीने केला. “ज्या मुलीला तू सुंदर दिसतेस असं कधीच कोणी म्हटलं नाही तिच्यासाठी भारतातील आघाडीच्या स्पर्धेत भाग घेणं ही खूप मोठी गोष्ट होती. मी सुष्मिता सेनचे आभार मानायला हवे. ती माझ्या पहिल्या पतीसह काम करत होती आणि आम्ही भेटलो आणि चांगली मैत्री झाली. रात्री दोन वाजता ती मला कविता ऐकवायची आणि म्हणायची की मी त्या मोजक्या लोकांपैकी एक आहे ज्यांना ती काय लिहितेय हे समजू शकतं. तिने मला क्लेरिजेस हॉटेलमध्ये सोडलं आणि स्पर्धेत अर्ज करण्यास सांगितलं, त्यामुळे १९९४ मध्ये मिस इंडियासाठी भरलेला शेवटचा फॉर्म माझा होता,” असं मानिनी डे म्हणाली.
मानिनीची सुश्मिताशी चांगली मैत्री होती, पण तिची ऐश्वर्या रायशी पहिली भेट झाली तेव्हाचा किस्सा तिने सांगितला. “मी कधीच गोव्याला गेले नव्हते, त्यामुळे तिथे जाण्याचा खूप उत्साह होता. गोव्याला गेल्यावर मी तिथे ऐश्वर्या रायला पाहिलं मग स्वतःलाच म्हटलं की तिच्याशी स्पर्धा करायला मला वेड लागलंय का. ती किती सुंदर मुलगी आहे, ती खूप दयाळू, विनम्र होती. ती फक्त सुंदर दिसतच नाही तर तिचा स्वभावही खूप चांगला आहे. त्या वेळी मी मिस कॉन्जेनिअलिटी स्पर्धा जिंकली होती, ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिने मला मत दिलं कारण मी तिला खूप गोड मुलगी वाटते,” असं मानिनी म्हणाली.
पालघरमधील ‘या’ गावात पाणी टंचाई, इरफान खानच्या लेकाने पैसे देऊन केली मदत, व्हिडीओ व्हायरल
ऐश्वर्या आणि सुश्मिता यांच्यात खरंच वैर होतं का? याबाबत मानिनी म्हणाली, “त्यांच्यामध्ये असं काहीही नव्हतं, हे सर्व माध्यमांनी तयार केलेलं होतं. त्या दोघीही खूप प्रतिष्ठित व समजुतदार होत्या, आम्ही आमच्या विशीत होतो. माझ्या माहितीप्रमाणे, त्यांच्यात अजिबात शत्रुत्व नव्हतं. जेव्हा आम्ही दिल्लीहून गेलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की ऐश्वर्या एका लोकप्रिय साबणाच्या ब्रँडची मॉडेल आहे.”
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
तुझी ऐश्वर्याशी चांगली मैत्री होती का? असं विचारल्यावर मानिनी म्हणाली, “तुम्ही ज्या लोकांना भेटता आणि ज्यांच्यासोबत काम करता ते तुमचे सहकलाकार असतात. सहकलाकार व मित्रांमध्ये फरक असतो. आम्ही सह-स्पर्धक होतो आणि तिथे त्या माझ्याशी खूप छान वागायच्या. ‘द्रोण’च्या स्क्रिनिंग वेळी मी तिथून जाताना ऐश्वर्याने मला हाक मारली होती, ते पाहून मला खूप आनंद झाला होता. मी तिच्याशी बोलायला लाजत होते, पण तिने मला खूप प्रेमाने मिठी मारली आणि ती माझ्या मुलीलाही भेटली होती.”
मनिनी डे ‘जस्सी जैसे कोई नही’, ‘शका लाका बूम बूम’, ‘गुलमोहर ग्रँड’ या लोकप्रिय शोचा भाग राहिली आहे. तिने ‘क्रिश’, ‘फॅशन’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इअर’ सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. मनिनी शेवटची ‘कॅम्पस डायरीज’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती.