पंजाबमधील रायविंद येथील २० वर्षीय खुर्शीद जहाँ ही मुंबईत आपल्या बहिणीला भेटायला आली होती. तिच्या बहिणीच्या नवऱ्याने तिला एका चित्रपटाच्या मुहूर्तासाठी नेलं होतं, तो चित्रपट सोहराब मोदींचा ‘सिकंदर’ होता. सोहराब मोदींनी त्या दिवशी खुर्शीदला पाहिलं आणि ती भावली. त्यामुळे त्यांनी तिला ‘सिकंदर’मध्ये तक्षशिला राजाच्या बहिणीची अंबीची भूमिका दिली. तिचं नाव बदलून मीना ठेवलं आणि तिच्याशी चित्रपटांबद्दलचा करार केला. ही गोष्ट १९४१ ची आहे.
‘सिकंदर’ चित्रपट हिट झाल्यावर मीनाला ‘शालीमार’ आणि मेहबूब खानने ‘हुमायूं’ मध्ये काम करण्याची ऑफर दिली. दलसुख पांचोलीनेही मीनाला त्यांच्या दोन चित्रपटांमध्ये कास्ट केलं. खुर्शीद यांचं कुटुंब गरीब होतं, त्यामुळे चित्रपटात काम मिळाल्याने कुटुंबाचे चांगले दिवस आले. पण, अचानक एके दिवशी मीनाला नोटीस आली. सोहराब मोदींनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये मीनाने त्यांच्यासोबत तीन चित्रपटांसाठी करार केला असल्याचे लिहिले होते. ते तीन चित्रपट होईपर्यंत ती दुसरा कोणताही चित्रपट साइन करू शकत नाही, असं त्यात नमूद होतं. मीना यांनी कराराचे उल्लंघन केले असल्याने तीन लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असं मोदींनी म्हटलं. पण, आपण तीन नव्हे तर एका चित्रपटासाठी करार केला होता. मोदींनी आपली फसवणूक केल्याचा आरोप मीनाने केला.
“…तर मी तुला मारून टाकेन” रीना रॉय यांनी शत्रुघ्न सिन्हांना दिलेली धमकी
या वादामुळे मीनाच्या करिअरवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे मीनाने मोदींकडे विनवणी केली, मोदींनीही नमतं घेत नुकसानभरपाईची रक्कम ६० हजारांपर्यंत कमी केली. पण ही देखील त्याकाळी मोठी रक्कम होती. त्यानंतर मीना मोदींच्या पत्नी महताबला भेटली. महताबने मध्यस्थी करत पैसे कमी करायला लावले. तीन लाख मागणाऱ्या मोदींनी अखेर ३० हजार घेऊन मीनाला करारातून मुक्त केले. यादरम्यान मीनाचे तीनदा लग्न झाले. पहिलं लग्न निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता जहूर राजाशी आणि दुसरं लग्न अल नासिर आणि तिसरं लग्न रूप के शौरी यांच्याशी झालं.
सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…
दुसरीकडे, भारत-पाक फाळणीमुळे लाहोरमधील रूप के शौरीचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे ते त्यांचा अपूर्ण पंजाबी चित्रपट ‘चमन’ घेऊन मुंबईत परतले. इथं त्यांनी मीनाच्या पैशाने ‘चमन’ पूर्ण केला आणि ‘एक थी लडकी’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात मोतीलाल आणि मीना यांची जोडी होती. संगीतकार विनोद यांनी संगीतबद्ध केलेले, ‘लारा लप्पा लारा लप्पा लै रखुदा,’ हे गाणं सुपर डुपर हिट ठरलं आणि मीना तरुणाईत लोकप्रिय झाली.
लाहोरमध्ये मीनाची लोकप्रियता पाहून १९५६ मध्ये पाकिस्तानी निर्माते जेसी आनंद यांनी शौरी आणि मीना यांना ‘मिस ५६’ चित्रपटासाठी निमंत्रित केलं. चित्रपट पूर्ण झाल्यावर शौरी भारतात परतले, पण मीनाला तिथे लक्सची जाहिरात मिळाली, त्यामुळे ती आली नाही. पाकिस्तानची पहिली लक्स गर्ल बनलेली लारा लप्पा गर्ल पाकिस्तानातच राहिली. तिथे तिने रझा मीर आणि असद बुखारी यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. मीनाने पाच लग्न केले.
मीनाने पाकिस्तानमध्ये २९ चित्रपट केले. त्यातल्या ११मध्ये तिने मुख्य नायिकेच्या भूमिका केल्या. पण यश हे आकाशात उडणाऱ्या पतंगासारखं असतं, ते कधी ना कधी खाली येतेच, असंच मीनाबरोबरही झालं. १९७४-७५ पासून आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर मीना यांनी ९ फेब्रुवारी १९८९ रोजी पाकिस्तानमध्ये अखेरचा श्वास घेतला. गरिबीतून वर आलेल्या खुर्शीद यांनी मीना बनून जवळपास तीन दशकं ग्लॅमरच्या झगमगाटात घालवली, पण त्यांचं निधन झालं, तेव्हा पाचपैकी एकही पती त्यांच्याबरोबर नव्हता. आसपासच्या लोकांनी वर्गणी गोळा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.