प्रियांका चोप्रा व परिणीती चोप्रा या दोन्ही बहिणी बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. ‘१९२० लंडन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मीरा चोप्रा ही प्रियांका व परिणीची बहीण आहे. अलीकडेच संदीप सिंग दिग्दर्शित ‘सफेद’ या चित्रपटात ती दिसली होती. कौटुंबिक संबंध असूनही प्रियांका व परिणीतीशी चांगला बाँड नाही, असं मीरा म्हणाली. तसेच सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केल्यावर बहिणींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही, असं विधान तिने केलं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मीरा म्हणाली, “सुरुवातीपासूनच आमच्यात इतकी जवळीक नव्हती की आमचं नातं मैत्रिणींसारखं वाटेल. पण एकाच कुटुंबातल्या तीन-चार मुली जेव्हा इंडस्ट्रीत येतात तेव्हा त्या एकमेकांना मदत करतात. माझ्याबाबतीत तसं घडलं नाही. मी कधीही मदत मागितली नाही आणि त्यांच्याकडून कधीही मदत मिळाली नाही. मी मदत मागणारी नाही आणि त्यांनी कधीच मदत केली नाही.”
मराठमोळ्या अभिनेत्याने गुजराती अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो आले समोर
मीराने तिचे बालपणीचे दिवस आठवले आणि सांगितलं की त्यांचे एक अतिशय मोठे संयुक्त कुटुंब होते. लहानपणी ते सर्व कुटुंबीय एकाच घरात राहायचे. “पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते, तेव्हा इतरांना फार महत्त्व देत नाहीत, कमी लेखू लागतात,” असं मीरा म्हणाली. मीराने सांगितलं की प्रियांकाच्या कुटुंबाशी तिचं चांगलं नातं आहे. तिने प्रियांका व निक यांच्या लग्नालाही हजेरी लावली होती, परंतु परिणीतीबरोबर तिचा फार चांगला बाँड नाही. कारण त्यांचे कुटुंबीय एकमेकांशी बऱ्याच काळापासून बोलत नाहीत. परिणीती-राघवच्या लग्नालाही ती आली नव्हती.
“आमचे कुटुंबीय एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलून माझ्या कुटुंबाला दुखवायचं नाही. मी अजूनही प्रियांकाच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. मी मधु काकींना चित्रपट दाखवायचा आहे. ते सर्व माझ्यासाठी खूप खूश आहेत. प्रियांका आणि माझं नातं खूप चांगलं होत, पण आता थोडा बदल झाला आहे. ती खूप मोठ्या मनाची आहे,” असं मीरा म्हणाली.