Model Neha Malik News : मॉडेल व बॉलीवूड अभिनेत्री नेहा मलिकने पोलीस तक्रार दाखल केली आहे. तिच्या घरातून ३४.४९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. २५ एप्रिल २०२५ रोजी ही घटना मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथील तिच्या फ्लॅटमध्ये घडली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी नेहाच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसवर गुन्हा दाखल केला आहे. तिचं नाव शहनाज मुस्तफा शेख (वय ३७) आहे.

पोलीस तक्रारीनुसार, चोरी गेलेले सगळे दागिने नेहाची आई मंजू मलिक यांचे होते. ते दागिने नेहाची आई विविध कार्यक्रमांमध्ये घालत असेल. नंतर ते दागिने तिच्या बेडरूममध्ये एका कुलूप नसलेल्या लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवत असत. मालाड पश्चिम येथे राहणारी शेहनाज शेख रोज नेहाच्या घरी यायची. तिला मंजू दागिने कुठे ठेवतात, याची कल्पना होती. तिने अनेकदा मंजू मलिक यांना कार्यक्रमानंतर ते दागिने काढून ड्रॉवरमध्ये ठेवताना पाहिलं होतं.

शेहनाज शेखवर नेहा व तिच्या घरातील सदस्यांचा खूप विश्वास होता. त्यामुळे घरात कोणी नसतानाही घरातली कामं करण्यासाठी नेहाच्या कुटुंबाने तिला एक जास्तीची चावी दिली होती. पण २५ एप्रिलला शेहनाजने घरात दागिन्यांची चोरी केली.

शेहनाज दुसऱ्या दिवशी कामावर आलीच नाही

नेहा मलिक सकाळी कामासाठी बाहेर पडली आणि तिची आई सकाळी ७:५० ते ९ वाजेपर्यंत गुरुद्वारामध्ये होती. त्यावेळी शेहनाज एकटीच घरात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती कामाला आली नाही. सुरुवातीला नेहा व तिच्या कुटुंबियांना शेहनाजचं सुट्टी घेणं विचित्र वाटलं. त्यानंतर काही वेळातच घरातील सोन्याचे दागिने गायब झाले आहेत, ही गोष्ट नेहाच्या लक्षात आली.

नेहा व तिच्या आईने नंतर घरात दागिन्यांची शोधाशोध केली. त्यांना वाटलं की दागिने कदाचित त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवले असतील. मात्र दागिने कुठेच सापडले नाहीत. यानंतर नेहाने पोलीस तक्रार दिली.

नेहाच्या तक्रारीनंत पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस शेहनाजचा शोध घेत आहेत, जेणेकरून तिने चोरी केलेले दागिने परत मिळू शकतील.