एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांच्या सौंदर्याचे असंख्य चाहते होते. मुमताज त्यांच्या दमदार अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होत्या. ७० च्या दशकात त्यांचं नाव शम्मी कपूर आणि राजेश खन्ना यांच्याशी जोडलं गेलं होतं. आता एवढ्या वर्षांनंतर त्यांनी यावर मौन सोडलं आहे. अभिनेत्रीच्या मते त्यांचं नाव अनेक कलाकारांशी जोडलं गेलं असलं तरीही अभिनेते जितेंद्र यांच्याशी जोडलं जाणं अशक्यच होतं. याचबरोबर त्यांनी यामागचं कारणही सांगितलं आहे.
मुमताज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. पण त्याच बरोबर त्यांनी त्यांच्या लव्ह लाइफवरही भाष्य केलं. अभिनेते जितेंद्र यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “७० च्या दशकात माझं नाव बऱ्याच अभिनेत्यांशी जोडलं गेलं मात्र जितेंद्र यांच्याशी माझं नाव कधीच जोडलं गेलं नाही. यामागचं कारण होतं त्यांची गर्लफ्रेंड शोभा कपूर.”
आणखी वाचा- श्रीदेवीशी जोडलं जात होतं जितेंद्र यांचं नाव, अभिनेत्रीला घरी आणलं अन् पत्नीसमोर…
मुमताज म्हणाल्या, “शोभा कपूर जितेंद्र यांच्याबद्दल खूप पझेसिव्ह होत्या. त्यामुळे जितेंद्र यांच्याशी ट्युनिंग होणंही कठीण होतं. त्यांच्याशी कोणी फ्लर्टही करू शकत नव्हतं. कारण शोभा त्यांच्याबद्दल खूपच पझेसिव्ह होत्या. जितेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निश्चयच त्यांनी केला होता. पण अशातही जितेंद्र यांच्याशी माझी चांगली मैत्री होती आणि अर्थातच ही गोष्टही त्यावेळच्या अनेक अभिनेत्रींना आवडत नव्हती.”
दरम्यान पुढे मुमताज यांनी १९७४ मध्ये मयुर माधवानी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर गेल्या. तर दुसरीकडे जितेंद्र यांनी गर्लफ्रेंड शोभाशी लग्नगाठ बांधली. या दोघांची मुलं एकता आणि तुषार कपूर आज बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत.