काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. गेले अनेक महिने ते या चित्रपटावर काम करत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या या आगामी चित्रपटाचं काम कुठपर्यंत आलं हे त्यांच्या चाहत्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर आता विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ शेअर करत हे गुपित उलगडलं आहे. या चित्रपटात कोण अभिनेत्री काम करताना दिसणार, याची घोषणा विवेक अग्निहोत्री यांनी केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्या अभिनेत्रीचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. त्यानुसार अभिनेत्री रायमा सेन या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसेल. विवेक अग्निहोत्री काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे गेलेले असताना त्यांनी रायमाचं काम पाहिलं आणि त्यांना ते खूप आवडलं. मग त्यांनी तिला या आगामी चित्रपटामध्ये कास्ट केलं. रायमाने या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे.
देशात कोविड काळात कशा प्रकारे वॅक्सिन तयार करण्यात आली, ती गोष्ट विवेक अग्निहोत्री या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहेत. ही कथा सत्यघटनेवर आधारित असणार आहे. हा चित्रपट ११ भारतीय भाषांमध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.