Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या ‘पुष्पा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. रश्मिका मंदाना आता बॉलीवूडचा भाइजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या ‘सिकंदर’ या आगामी चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तिने या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खानबरोबरचा एक किस्सा सांगितला आहे.
रश्मिकाने ‘इंडिया टुडे’ डिजिटलशी ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल तिचा अनुभव आणि यातील शूटिंगवेळीचे काही किस्से सांगितले आहेत. सलमानचे कौतुक करताना ती म्हणाली, “हा अनुभव म्हणजे अगदी एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. सलमान सर अत्यंत चांगली व्यक्ती असून ते अतिशय साधे आणि नम्र स्वभावाचे आहेत.”
हेही वाचा : “अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
आजारी असतानाचा किस्सा
तसेच पुढे रश्मिकाने ती आजारी असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, “जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, तेव्हा माझी तब्येत बिघडली होती. मला बरं वाटत नव्हतं. ज्या क्षणी त्यांना हे माहिती झालं, तेव्हा ते माझ्या जवळ आले आणि माझी विचारपूस केली. तसेच सेटवर सर्व टीमला माझी काळजी घेण्यास सांगितले. शिवाय मला चांगले जेवण आणि गरम पाणी अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले.”
“ते खरोखर आपली काळजी घेतात व आपण किती खास आहोत याची जाणीव करून देतात. ते देशातील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहेत, पण तरीही ते फार नम्र स्वभावाचे आणि व्यावहारिक आहेत”, असंही रश्मिका पुढे म्हणाली.
‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी या चित्रपटासाठी फार उत्सुक आहे. तसेच माझ्यासाठी हा फार खास चित्रपट असून प्रेक्षक आणि चाहत्यांप्रमाणे मलाही ‘सिकंदर’ रुपेरी पडद्यावर पाहण्याची उत्सुकता आहे.”
हेही वाचा : लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल–ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘डियर कॉम्रेड’ या दाक्षिणात्य चित्रपटातून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटानंतर ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर बॉलीवूडच्या ‘अॅनिमल’ चित्रपटातील तिची भूमिकादेखील चाहत्यांना फार आवडली. रश्मिकाच्या ‘पुष्पा २’ चित्रपटातील अभिनयाचेही चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. आता तिच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रश्मिका सध्या ‘छावा’, ‘कुबेर’, ‘द गर्लफ्रेंड’ या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे.