दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘पुष्पा द राइज’, ‘अॅनिमल’ आता ‘पुष्पा 2 द रूल’ अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांची नायिका येत्या काळात सिनेसृष्टीतील सुपरस्टार्सबरोबर काम करताना दिसणार आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या रश्मिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरीच चर्चा होत असते. ती तिचा ‘गीता गोविंदम’ व ‘डिअर कॉम्रेड’मधील को-स्टार विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण त्याआधी अभिनेत्रीने तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या एका अभिनेत्याशी साखरपुडा केला होता.
‘पुष्पा 2’ च्या यशामुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाने आठ वर्षांपूर्वी तिच्या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार रक्षित शेट्टी याच्याशी साखरपुडा केला होता. रश्मिका मंदाना व रक्षित शेट्टी यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘किरीक पार्टी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते डेट करू लागले. काही काळाने त्यांनी साखरपुडा केला. मात्र, दोघांचं नातं फार टिकलं नाही.
वर्षभरात मोडला साखरपुडा
काही काळ डेट केल्यानंतर रश्मिका व रक्षित यांनी ३ जुलै २०१७ रोजी एंगेजमेंट केली होती. त्यावेळी रश्मिका फक्त २१ वर्षांची होती, तर रक्षित ३४ वर्षांचा होता. दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर होते. मात्र साखरपुड्यानंतर त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. वर्षभराने सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा साखरपुडा मोडला व ते वेगळे झाले. या दोघांनीही साखरपुडा मोडण्याचं कारण कधीच सांगितलं नाही.
हेही वाचा – दिसण्याबद्दल विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारने दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”
रक्षित व रश्मिकाचं नातं कसं आहे?
रश्मिका व रक्षित यांचा साखरपुडा मोडला असला, तरी ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. रक्षितने एकदा इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्यांच्या बाँडबद्दल सांगितलं होतं. रक्षित म्हणाला होता की तो व रश्मिका एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघेही अधूनमधून मेसेज करतात. तसेच त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला की ते एकमेकांना शुभेच्छा देतात.
रक्षित शेट्टीचे चित्रपट
रक्षितने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. ‘777 चार्ली’, ‘सप्त सागरादाचे एलो – साइड ए’, ‘बॅचलर पार्टी’, ‘किरिक पार्टी’, अवाने ‘श्रीमन्नारायणा’ हे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाच्या डेटिंगच्या चर्चा
रश्मिका मंदाना सध्या तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. रश्मिकाने दिवाळीत विजयच्या घरात फोटोशूट केलं होतं. तसेच ‘पुष्पा २’ चित्रपट तिने त्याच्या कुटुंबाबरोबर पाहिला होता. असं असलं तरी आतापर्यंत रश्मिका किंवा विजय यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केलेलं नाही.