उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रा भारतातील महत्त्वाच्या धार्मिक यात्रांपैकी एक आहे. देशाच्या अनेक भागांमधून भाविक केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र, डोंगरावर वसलेल्या केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविक घोडा आणि खच्चरची स्वारी पसंत करतात. परंतु काही प्रसंगी या प्राण्यांना मारहाण करण्यासह शारीरिक त्रासही दिला जातो. अनेकदा या प्राण्यांचा छळ कऱणारे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, केदारनाथ येथील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती एका घोड्याला बळजबरीने गांजाची सिगरेट पाजताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर उत्तराखंड पोलिसांनीही प्रतिक्रिया दिली असून, या व्हिडीओतील व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता अभिनेत्री रविना टंडनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रविनाने हा व्हिडीओ तिच्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रविनाने लिहिलूय, ‘आपल्या पवित्र ठिकाणी घोड्यांवर होणाऱ्या या सततच्या अत्याचाराला आपण थांबवू शकतो का? निरपराधांवर अत्याचार होत असताना हे लोक कोणते कर्मे करतायत किंवा प्रार्थनांमधून काय मिळवतायत? केदारनाथमधून हे रील व्हायरल होत आहे. ‘या लोकांना अटक करता येईल का?’ असा प्रश्न रविनाने विचारला आहे. तिने हा व्हिडीओ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि मनेका गांधी यांना टॅग केला आहे.