Khushi Kapoor Vedang Raina Video: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये (Janhvi Kapoor Shikhar Pahariya) आहे. जान्हवीने आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नातील ती प्रत्येक समारंभात जान्हवी शिखरबरोबर हजर राहिली होती. अनेकदा ती शिखरच्या नावाचा क्यूट नेकलेस घालून प्रेम व्यक्त करत असते. जान्हवीनंतर आता तिच्या लहान बहिणीच्या नात्याची चर्चा होत आहे.
चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kaoor) व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची धाकटी लेक खुशी कपूर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. खुशीचं नाव अभिनेता वेदांग रैनाशी जोडलं जात आहे. खुशी व वेदांग यांनी झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. तेव्हापासूनच या दोघांचे अफेअर असल्याची चर्चा होत आहे. अनेकदा दोघेही एकत्र इव्हेंटला जाताना दिसतात. इतकंच नाही तर अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात खुशी वेदांगबरोबर पोहोचली होती. दोघांनी एकत्र पोजदेखील दिल्या होत्या. त्यानंतर आता वेदांग व खुशीचा सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्याबरोबरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रेखा यांचा खुशी व वेदांगबरोबरचा व्हिडीओ
जान्हवी कपूरचा ‘उलझ’ चित्रपट आज (२ ऑगस्ट) प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचं स्क्रीनिंग गुरुवारी, १ ऑगस्टला ठेवण्यात आलं होतं. या स्क्रीनिंगला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी आले होते. रेखा यांनीही जान्हवीच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिला आशीर्वाद दिले व तिच्याबरोबर फोटोही काढले. त्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या वेदांग व खुशीबरोबर दिसत आहेत. रेखा खुशी व वेदांगचे हात पकडून इव्हेंटमधून बाहेर पडल्या. यावेळी हे तिघेही गप्पा मारत हसत होते. नंतर रेखा यांनी वेदांग व खुशीला मिठी मारून आशीर्वादही दिले.
दरम्यान, ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात खुशी कपूर बहीण जान्हवीबरोबर आली होती, तेव्हा तिला वेदांगबद्दल विचारल्यावर तिने स्पष्ट उत्तर देणं टाळलं होतं. त्यानंतर अनेकदा हे दोघे एकत्र पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होतात. अनंत-राधिकाच्या लग्नात जान्हवी -शिखर, खुशी-वेदांग हे चौघेही एकत्र पोहोचले होते. तसेच नुकत्याच झालेल्या एका फॅशन शोमध्ये वेदांग व खुशी यांनी एकत्र वॉक केला होता. या फॅशन शोमधील त्यांच्या फोटोंची खूप चर्चा झाली.