बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रेणुका शहाणे. ‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटातून त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. रेणुका शहाणे यांना कायमच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. त्या नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले आहे.
रेणुका शहाणे यांनी नुकतंच ‘पिंकविला’ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. यावेळी रेणुका शहाणे यांनी त्यांना लहानपणी समाजाकडून, लोकांकडून अनेक टोमणे, टीका सहन करावी लागली, असा गौप्यस्फोट केला आहे.
आणखी वाचा : “हम आपके है कौन? या चित्रपटामुळे मी…”, रेणुका शहाणे रमल्या जुन्या आठवणीत
“मी लहान असतानाच माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. लहानपणीच माझे आई-वडील वेगळे झाले. त्यानंतर माझं पहिलं लग्न झाल्यानंतर माझाही घटस्फोट झाला. त्यामुळे माझा विवाहसंस्था, लग्न यावरचा विश्वास उडाला होता. पण त्यानंतर जेव्हा माझं आशुतोष राणांशी दुसरं लग्न झालं, तेव्हा मी वयाने आणि अनुभवाने मोठी झाली होती. त्यामुळे नातेसंबंध सुधारण्यासाठी येणाऱ्या आव्हानांनाही मला सहजपणे तोंड देता आले, असे रेणुका शहाणे म्हणाल्या.
“मी लहान असताना आई वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर अनेक लोक माझ्याशी वाईट वागू लागले. ते मला एका वेगळ्या नजरेत पाहायचे. अनेकदा ते त्यांच्या मुलांना माझ्याशी खेळू नका, असे सांगायचे. हिचे आई-वडील विभक्त झाले आहेत, त्यांचा संसार मोडलाय, अशी कुजबूज अनेकदा माझ्याबद्दल व्हायची. माझे शिक्षकही फार वाईट होते. तुम्ही ‘त्रिभंगा’ या चित्रपटातील एक सीन पाहिला असेल, ज्यात त्या मुलीला तिच्या आईबद्दल आणि आडनावाबद्दल विचारले जाते, माझ्या बाबतीतही असेच घडले आहे”, असा खुलासा रेणुका शहाणे यांनी केला.
आणखी वाचा : दोन घटस्फोट झालेल्या स्नेहा वाघचे प्रेम आणि रिलेशनशिपबद्दल वक्तव्य, म्हणाली “त्या माणसाशी…”
यावेळी रेणुका शहाणे यांनी त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केले. “माझे पहिले लग्न मराठी नाट्यलेखक विजय केंकरे यांच्याशी झाले होते. त्यानंतर माझ्या आयुष्यात आशुतोष राणा आले. माझ्या पहिल्या लग्नातून आणि घटस्फोटामुळे मला खूप काही शिकायला मिळाले आहे. कारण मी यानंतर अनेक वर्षांनी आशुतोष राणाच्या प्रेमात पडले.
त्यावेळी लग्नाबद्दल माझे मत निश्चितच चांगले नव्हते. मी खूप वास्तववादी होते. त्यावेळी मी चढ-उतार सहजरित्या हाताळू शकत होती. कारण तेव्हा मी मॅच्युअर झाली होती. माझे लग्न झाले तेव्हा मी ३४ किंवा ३५ वर्षांची होते आणि भारतात लग्नासाठी हे वय फार जास्त मानलं जाते.” असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या लग्नाला आता अनेक वर्ष उलटली आहेत. त्यांना शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुलंदेखील आहेत. आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे दोघंही कलाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून आजवर त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.