अभिनेत्री सान्या मल्होत्रा ‘दंगल’ चित्रपटामुळे नावारूपाला आली. ‘दंगल’नंतरही तिने अनेक चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आज तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सान्याही सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तर आता तिने तिला काही वर्षांपूर्वी दिल्ली मेट्रोमधून प्रवास करताना आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.
सान्या मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना तिला एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि हे घडत असताना कोणीही तिच्या मदतीला आले नाही. हा प्रसंग ती अजूनही विसरू शकलेली नाही, असेही ती म्हणाली. आता अनेक वर्षांनी तिने याचा खुलासा केला आहे.
सान्या म्हणाली, “एके दिवशी मी संध्याकाळी कॉलेजमधून घरी येत होते तेव्हा एक मुलगा त्याच्या काही मित्रांबरोबर मेट्रोमध्ये चढला. यानंतर त्याने माझ्याशी गैरवर्तन करायला सुरुवात केली. त्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी मेट्रोतून उतरेपर्यंत तो हेच करत राहिला. त्या वेळी माझ्याबरोबर कोणीही नसल्याने मी गप्प राहिले. लोक नेहमी म्हणतात की, अशा वेळी मुलींनी प्रतिकार केला पाहिजे, पण मला वाटते त्या वेळी तुम्ही खूप घाबरता आणि तुम्हाला काही सुचत नाही.”
हेही वाचा : …म्हणून ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये सान्याला घेणं टाळलं
पुढे ती म्हणाली, “हे सगळे घडत असताना मेट्रोमधील इतर कोणीही व्यक्ती माझ्या मदतीला आली नाही. राजीव चौक स्टेशनवर उतरल्यावर काही मुले माझा पाठलाग करत आहेत, हे माझ्या लक्षात आले. प्लॅटफॉर्मवर गर्दी होती म्हणून मी त्यांची नजर चुकवून पळू शकले. मी स्वच्छतागृहात गेले आणि तिथून माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना मला घ्यायला यायला सांगितले.” आता सान्याचे हे बोलणे चांगलेच चर्चेत आले आहे.