१९९४ साली ‘इक्के पे इक्का’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शांतीप्रिया प्रमुख भूमिकेत झळकले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शांतीप्रियाने अक्षयबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला वाईट अनुभव आल्याचे तिने सांगितलं.
‘बॉलीवूड ठिकाना’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “आम्ही ‘इक्के पे इक्के’ चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट करत होतो. त्यावेळी मी शॉर्ट ड्रेस घातला होता, कारण माझी भूमिका ही ग्लॅमरस होती. मी स्कीन टाईट शॉर्ट ड्रेस परिधान केला होता, तर खाली स्कीन कलरचे स्टॉकिन्स घातले होते. माझ्या गुडघ्यांचा रंग थोडा गडद होता. अक्षय कुमारचा स्वभाव जॉली आहे ही गोष्ट वेगळी, पण १०० लोकांसमोर तुम्ही कोणालाही काहीही बोलू शकत नाही. अक्षय मला म्हणाला होता, शांती तुझ्या गुडघ्याला काही लागलं आहे का? मी जसं खाली बघितलं तर म्हणाला, बघ किती काळे झाले आहेत आणि हसायला लागला.”
पुढे ती म्हणाली, “९० च्या दशकात दाक्षिणात्य दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांसाठी जाड अभिनेत्री घ्यायचे. पण, त्यांना कधी बारीक शरीरयष्टी असलेली अभिनेत्री हवी असेल तेव्हा ते मुंबईत यायचे आणि बॉलीवूडमधील अभिनेत्रींची निवड करून ते त्यांना ग्लॅमरस लुक द्यायचे. मी साऊथमध्ये चित्रपट केले आहेत आणि माझ्या बहिणीनेही केले आहेत. आमची फिगर कधीच स्मॉल किंवा एक्स्ट्रॉ स्मॉल नसायची.”
दरम्यान, शांतीप्रिया ही ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘बाजीगर’ या लोकप्रिय चित्रपटांतील अभिनेते सिद्धार्थ रे यांची पत्नी आहे. तिने सिद्धार्थ यांच्याबरोबरही चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षांनीच सिद्धार्थ यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर त्यांच्या मुलाला शांतीप्रिया यांनी एकटीने वाढवलं.