ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या गेले काही दिवस खूपच चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘गुलमोहर.’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षांनी सिनेसृष्टीत पुनरागमन केले. साठ-सत्तरच्या दशकात शर्मिला टागोर या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. शर्मिला टागोर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असे काही चित्रपट केले, जे आजही ‘कल्ट’ मानले जातात. यातील एक चित्रपट म्हणजे १९६९ साली प्रदर्शित झालेला ‘आराधना’. शर्मिला टागोर यांनी त्यांच्या या चित्रपटाची तुलना एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’शी केली आहे.
अलीकडेच त्या दिल्लीत झालेल्या ‘ब्रेकिंग द बाउंडरीज : ॲन ॲक्सिडेंटल ॲक्टर टू ॲन आयडॉल’ या कार्यक्रमाला हजर होत्या. यातील एका सत्रात त्यांची मुलाखत घेण्यात आली. या वेळी त्यांनी १९६७ मध्ये ‘ॲन इव्हनिंग इन पॅरिस’ या चित्रपटानंतर अर्थपूर्ण चित्रपट करायला का सुरुवात केली हे सांगितले. याचबरोबर शर्मिला यांनी ‘आराधना’च्या प्रदर्शनाच्या वेळी चेन्नईत हिंदीविरोधी आंदोलन सुरू झाल्याच्या आठवणींनाही उजाळा दिला.
आणखी वाचा : “मी तुझं मत विचारलेलं नाही…” भर मुलाखतीत शर्मिला टागोर व नात सारा आली खान यांच्यात वाद
शर्मिला टागोर म्हणाल्या, “जेव्हा १९६९ मध्ये ‘आराधना’ प्रदर्शित झाला तेव्हा चेन्नईत हिंदीच्या विरोधात खूप आंदोलने झाली होती. त्या वेळी हिंदी भाषेवर बहिष्कार टाकण्याचा प्रकार घडला होता. तरीही ‘आराधना’ चित्रपटगृहांत ५० आठवडे चालला. हा आमच्या काळातील ‘RRR’ चित्रपट होता. भावना भाषेच्या पलीकडे जातात हे यातून दिसून येते. आमचे चित्रपट, ते कोणत्याही क्षेत्रातून आले असले तरी, लोकांना हसवतात आणि रडवतात. त्यामुळे आमच्यातील समानता आमच्यातील फरकांपेक्षा जास्त आहे.”
शर्मिला टागोर यांचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. त्यांच्या या बोलण्यावर नेटकरी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.