अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या बॉलीवूडमधील चर्चेतलं नाव आहे. २०२४ हे वर्ष तिच्यासाठी खास ठरलं आहे. तिच्या ‘मुंज्या’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला. २०२४ मध्ये दोन महिन्यांच्या अंतराने शर्वरीचे तीन सिनेमे आले आहेत. सर्वात आधी ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिस गाजवलं, नंतर तिची मुख्य भूमिका असलेला ‘महाराज’ आला. या सिनेमाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नुकताच तिचा जॉन अब्राहमबरोबर आलेला ‘वेदा’ हा सिनेमा सध्या चित्रपटगृहात सुरू आहे. आपल्या अभिनयाबरोबरच शर्वरी तिच्या डेटिंग लाइफमुळेही नेहमी चर्चेत असते. ती विकीचा भाऊ अभिनेता सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे. अशातच तिने रिलेशनशिपमध्ये कुठल्या गोष्टीं अमान्य आहे यावर भाष्य केलं.

फिल्मफेअरच्या एका नवीन मुलाखतीत शर्वरीला रिलेशनशिपमध्ये ती जर डेट करत असेल तर नात्यात कोणत्या गोष्टींची तडजोड होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शर्वरी म्हणाली की, तिच्या मते नात्यात जोडीदाराने एकमेकांना फसवणं हा रेड फ्लॅग आहे, म्हणजेच ही गोष्ट अमान्य आहे. या गोष्टीबद्दल तडजोड होऊच शकत नाही. यादरम्यान शर्वरीने ती नात्यात आहे की नाही यावर बोलणं टाळलं.

हेही वाचा…बॉलीवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट युट्यूबवर झाला प्रदर्शित, ४५ कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटाने फक्त कमावले होते ‘इतके’ कोटी

पुढे शर्वरी म्हणाली की, नात्यात आधीपासूनच काय गोष्टी कराव्यात किंवा करू नयेत यावर तिचा विश्वास नसून, तुम्ही नात्यात असाल किंवा नसाल, एकमेकांप्रती आदर असणं फार महत्त्वाचं आहे. जर मी नात्यात असेल, तर माझ्या मते त्या नात्यात फसवणूक करणं हे अमान्य आहे. असं झाल्यास मला वाटेल की माझा अनादर झाला आहे. शर्वरीला ती तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे अशा चर्चा असतात असं विचारलं असता, तिने हसत उलट प्रश्न विचारत, “तुम्हाला कोणी सांगितलं की मी रिलेशनशिपमध्ये आहे?” असं बोलून यावर उत्तर देणं टाळलं.

शर्वरीला कसा मुलगा हवा?

शर्वरीला कसा मुलगा हवा याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मला विनोदी मुलगा हवा आहे. माझ्यासाठी एखाद्या मुलात ह्युमर असणं महत्त्वाचं आहे.” शर्वरी पुढे म्हणाली की, तिच्या आयुष्यात डेटिंगबद्दल सांगण्यासारखं खूप काही नाहीये, पण तिने आतापर्यंत दोन मुलांना डेट केलं आहे आणि त्यांचं विनोदी असणं तिला आकर्षक वाटलं. सनी कौशलला ती डेट करत असल्याच्या चर्चा असताना, ती सिंगल असल्याचं तिने सांगितलं.

हेही वाचा…बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानचे ब्रेकअप, तीन वर्षांनी बॉयफ्रेंडपासून झाली वेगळी, ‘हे’ ठरलं कारण

दरम्यान, शर्वरी ‘अल्फा’ या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील ॲक्शन-थ्रिलर सिनेमाची तयारी करत आहे. यात ती आलिया भट्टसोबत दिसणार आहे. शर्वरी वाघने २०२१ मध्ये ‘बंटी और बबली २’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी, राणी मुखर्जी, आणि सैफ अली खान होते. हा सिनेमा २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’चा सिक्वेल होता. शर्वरीने २०२० मध्ये सनी कौशलसोबत ‘द फॉरगॉटन आर्मी – आझादी के लिए’ या वेब सिरीजमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.