‘आदिपुरुष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘रामायणा’वर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात फार उत्सुकता होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याने केलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने या चित्रपटात सीतेची भूमिका साकारली आहे. याचबरोबर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसत आहे.
हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आणि चित्रपट बघताना मराठी प्रेक्षकांना अनेक सरप्रायझेस मिळाली. आतापर्यंत फक्त देवदत्त नागे हा मराठी अभिनेता या चित्रपटात दिसणार हे प्रेक्षकांना माहीत होतं. पण आता या चित्रपटात आणखीही काही मराठी कलाकार प्रेक्षकांना दिसत आहेत.
आणखी वाचा : “चित्रपटात गोरिला का दाखवलेत…,” ‘आदिपुरुष’वर नेटकऱ्यांची जोरदार टीका, म्हणाले, “धर्माचं नाव…”
आज ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत दिसली. तर याचबरोबर आणखी एक मराठी अभिनेत्री या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ही अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. आज यानिमित्त सोनालीने एक खास पोस्ट शेअर करत या चित्रपटात ती कैकेयीची भूमिका साकारत असल्याचे सांगितलं. नुकताच तिने तिचा एक फोटो शेअर करत या चित्रपटाचा भाग होता आलं याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा : ‘आदिपुरुष’च्या टीमसाठी सुबोध भावेने केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “तुम्ही सर्वांनी…”
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हा चित्रपट अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल जरी होत असला तरीही या चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट किती गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.