मराठमोळी अभिनेत्री तृप्ती खामकर नुकतीच करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सुपरहिट ‘क्रू’ चित्रपटामध्ये झळकली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल तिने माहिती दिली आहे. १२ तासांच्या शिफ्टमध्ये बोलावून फक्त अर्ध्या तासात काम पूर्ण करायला सांगितलं जायचं. तसेच मुख्य कलाकार सेटवरून निघून गेल्यावरच आपलं शूटिंग सुरू व्हायचं, असं तृप्ती म्हणाली.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही मोठ्या स्टारकास्टबरोबर काम करत असता तेव्हा आधी त्यांचं शूट पूर्ण केलं जातं आणि ते घरी जातात, मग तुमचं काम सुरू होतं. क्रूच्या सेटवर असं व्हायचं की १२ तासांच्या शिफ्टमध्ये सगळे कॅमेरे त्यांच्यावरच असायचे. मी तिथे उभे राहून माझे संवाद पाठ करायचे. मग ते कलाकार काम आटोपून निघून जायचे आणि शिफ्टचा शेवटचा अर्धा तास बाकी असायचा तेव्हा ते मला म्हणायचे ‘तृप्ती, आज तुझं जे काम असेल ते अर्ध्या तासात कर.’ मग मी म्हणायचे, ठीक आहे, मी. करते.”
तृप्ती पुढे म्हणाली, “‘क्रू’मध्ये काम केल्यावर असं वाटतंय की आम्ही सहाय्यक भूमिका करणारे कलाकार कोणतंही आव्हान स्वीकारू शकतो आणि ते पूर्ण करू शकतो. मला कोणी नीट संवाद दिले नव्हते आणि स्क्रिप्टही नव्हती, पण मी बाजूला उभे राहून शूट होणारे सीन लक्ष देऊन पाहायचे, जेणेकरून कुठे काय घडलं ते माहित असावं. मी इथं खूप शिकले. खरंतर मी थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे, पण पदवीचा उपयोग नाही. तुम्हाला सेटवरच खरं काम शिकायला मिळतं. तुम्हाला दिवसभर सजग राहावं लागतं, सीन लक्षात ठेवावे लागतात. जर सेटवर तुम्हाला संवाद दिले नसतील तर तुम्ही परफॉर्म केल्याशिवाय घरी येऊ शकत नाही. तुम्ही सेटवरच संवादांशिवाय कसं परफॉर्म करायचं ते शिकता.
“सीन शूट होताना कोणी कोणत्या ओळी म्हटल्यात ते पाहावं लागतं. त्यातूनच तुम्ही तुमच्या सीनमध्ये काय बोलणार त्याचा विचार करावा लागतो. ‘क्रू’ मध्ये काम केल्यानंतर मला वाटतंय की मी आता कोणत्याही आव्हानात्मक सेटवर काम करू शकते, कारण या सेटवर मला खूप काही शिकायला मिळालं,” असं तृप्ती म्हणाली.