एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा काल भारत विरुद्ध पाकिस्तान, असा सामना रंगला. या सामन्यात भारताने सात गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. सर्वांच्याच मनात या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हा सामना प्रत्यक्षपणे पाहण्यासाठी देशातील विविध ठिकाणांहून प्रेक्षक अहमदाबादला आले होते. त्याबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावली. त्यापैकीच एक अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. पण, हा सामना प्रत्यक्ष बघणे तिला खूपच महागात पडले आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या कामापेक्षाही तिच्या लाइफ स्टाईलमुळे अधिक चर्चेत असते. ती खूप मोठी क्रिकेटप्रेमी आहे. अनेकदा ती देशातच नव्हे, तर परदेशांतही भारताचे सामने बघायला जात असते. कालही ती भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आली होती. पण, कालच्या सामन्यादरम्यान तिचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन हरवला.
आणखी वाचा : उर्वशी रौतेलाच्या ६० लाखाच्या ड्रेसची सर्वत्र रंगली चर्चा, ‘असा’ होता तिचा आकर्षक लूक
उर्वशीने आज तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा प्रकार सांगितला. तिने लिहिलं, “माझा २४ कॅरेट गोल्ड आयफोन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हरवला आहे. जर कोणाला तो मिळाला, तर कृपया माझ्याशी लवकरात लवकर संपर्क साधा.”
तिने केलेले हे ट्वीट आता चांगलेच चर्चेत आले आहे. या ट्वीटवर कमेंट करीत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे आता काही जण तिच्या निष्काळजीपणाची खिल्ली उडवत आहेत; तर काही जण तिला तिचा आयफोन लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रार्थना करीत आहेत.