बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोलकात्याच्या सियालदह न्यायालयाने जरीन खानच्या नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. कोलकाता येथील एका इव्हेंट कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर २४ परगणा येथील काली पूजेच्या ६ कार्यक्रमांना जरीन उपस्थित राहिली नसल्याचे तक्रारीत म्हणले आहे. या प्रकरणी अभिनेत्रीविरोधात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्यावतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर नरकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले. मात्र, जरीनकडून अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
जरीन खानने २०१० मध्ये सलमान खानसोबतच्या ‘वीर’ चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातून जरीनला खूप प्रसिद्धीही मिळाली. पण काही काळानंतर चाहते तिच्या लूकची अभिनेत्री कतरिना कैफशी तुलना करू लागले. या तुलनेवर जरीने मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती.
जरीन खान म्हणाली, “जेव्हा माझी कतरिनासोबत तुलना केली जाते तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण मी स्वतः तिची खूप मोठी चाहती आहे आणि मला ती खूप सुंदर वाटते. पण या तुलनेचा माझ्या करिअरवर विपरीत परिणाम झाला. तुलनेमुळे इंडस्ट्रीतील लोकांनी मला माझे कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिली नाही.”