कतरिना कैफ बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत राहून तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले. तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. पण आता “कतरिनामुळे मला बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी संधीच दिली गेली नाही”, असं विधान सलमान खानने लॉन्च केलेल्या एका अभिनेत्रीने केलं आहे.
अभिनेत्री म्हणजे झरीन खान. सलमान खानच्या ‘वीर’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु इतक्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमधून पदार्पण करू नये बॉलीवूडमध्ये ती फारशी चमकली नाही. विविध चित्रपटांमध्ये काम करून तिने तिचं करिअर वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिला यश आलं नाही. आता याबाबत तिने खंत व्यक्त केली आहे.
झरीनने नुकतंच Reddit वर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं. यावेळी तिने चाहत्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. यादरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं, “बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या काळापासूनच तुझी तुलना कतरिना कैफशी केली जायची. त्याबद्दल तुला कसं वाटलं आणि मोठ्या पडद्यावर त्याचा काही प्रभाव पडला का?” त्यावर उत्तर देत झरीन म्हणाली, “मी बॉलीवूडमध्ये आले तेव्हा मी खरोखरच एका हरवलेल्या मुलासारखी होते. माझ्याकडे कोणतीही चित्रपटाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे जेव्हा माझी कतरिनाशी तुलना केली गेली तेव्हा मला खूप आनंद झाला. मीही तिची चाहती आहे. मलाही ती आवडते. पण त्याचा माझ्या करिअरवर विपरीत परिणाम झाला. कारण या क्षेत्रातील लोकांनी मला माझं व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधीच दिली नाही.”
दरम्यान, ‘वीर’नंतर झरीनने ‘रेडी’ आणि ‘हाऊसफुल २’ सारख्या चित्रपटांतूनही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.