Zeenat Aman : अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ चित्रपट त्या काळी फार हिट झाला होता. या चित्रपटातील ‘खइके पान बनारस वाला’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं. गाण्यातील बोल आणि अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहून साऱ्यांनीच या गाण्याला डोक्यावर घेतलं होतं. आजही हे गाणं अनेक समारंभांत ऐकायला मिळतं. चाहते आनंद व्यक्त करताना या गाण्याच्या तालात थिरकताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का? ‘खइके पान बनारस वाला’ गाणं सुरुवातीला ‘डॉन’ चित्रपटासाठी नव्हतं. बॉलीवूडच्या दुसऱ्या एका चित्रपटात हे गाणं दिसणार होतं. पण त्यावेळी नेमकं काय झालं? आणि ‘खइके पान बनारस वाला’ गाणं ‘डॉन’ चित्रपटात कसं आलं याची माहिती दिग्गज अभिनेत्री ‘झीनत अमान’ यांनी सांगितली आहे.
झीनत अमान यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या गाण्याच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पोस्टमध्ये त्यांनी या गाण्याचा एक किस्सा सांगितला आहे. “जर तुम्ही मनोरंजन विश्वात काम करीत असाल आणि नशिबाची साथ मिळाली, तर तुम्हाला अविस्मरणीय कामाचा भाग होण्याची संधी मिळते”, असं त्यांनी पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं आहे.
हेही वाचा : १२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
पुढे त्यांनी हे गाणं कोणत्या चित्रपटात आधी घेतलं जाणार होतं त्याची माहिती सांगितली आहे. त्यांनी लिहिलं, ” ‘खइके पान बनारस वाला’ गाणं सुरुवातीला ‘डॉन’ चित्रपटासाठी बनवण्यात आलं नव्हतं. हे गाणं देव आनंद यांच्या ‘बनारसी बाबू’ चित्रपटात दिसणार होतं. मात्र, हे गाणं चांगलं नसल्याचं सांगत ते तेथून रद्द करण्यात आलं. त्यावेळी दिग्दर्शक चंद्र बरोट यांनी अमिताभ बच्चन अभिनित ‘डॉन’ची शूटिंग पूर्ण केली होती. मात्र, त्यांना असं जाणवलं की, चित्रपटातील गंभीर कथानकाचे संतुलन साधण्यासाठी यात काही वेगळी गाणी आणि साध्या क्षणांची आवश्यकता आहे. त्यानंतर ‘खइके पान बनारस वाला’ गाण्याच्या शूटिंगसाठी सर्व जण महबूब स्टुडिओमध्ये आले आणि शूटिंग पूर्ण केलं.”
आठवणी सांगताना झीनत अमान यांनी लिहिलं, “या गाण्यात किशोर कुमार यांचा मधुर आवाज आणि अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त डान्स असल्यानं गाणं पुढे सुपरहिट झालं. या गाण्यातील संगीत, कलाकार या सर्वांच्या मेहनतीनं भारतीय सिनेविश्वातील सर्वांत जास्त काळ आठवणीत राहणाऱ्या गाण्यांच्या यादीत ‘खइके पान बनारस वाला’ गाणं सहभागी झालं.”, असं झीनत अमान यांनी लिहिलं आहे.
पुढे त्यांनी अमिताभ बच्चन यांची या गाण्यातील सर्वांत जास्त लक्षात राहिलेली एक गोष्ट सांगितली. त्यांनी लिहिलं, “गाण्याचं शूटिंग पूर्ण करण्यासाठी आम्हाला बरेच दिवस लागले. मला यात चांगल्या प्रकारे आठवतं की, अमिताभ बच्चन यांनी गाणं हिट व्हावं यासाठी मोठी मेहनत घेतली. तसेच सेटवर त्यांनी शूटिंग सुरू असताना किती पानं खाल्ली हे माझ्या अजूनही लक्षात आहे. त्यावेळी गाण्यात नृत्य करताना दिग्दर्शकांनी मला उंच टाचांच्या चपला घालण्यासाठी सांगितल्या होत्या.”
हेही वाचा :Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
झीनत अमान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये फरहान अख्तरने केलेल्या रिमेकचं आणि शाहरुख खान, तसेच प्रियांकाच्या अभिनयाचंसुद्धा कौतुक केलं. त्यांनी लिहिलं, “पुढे २००६ मध्ये फरहान अख्तरने या चित्रपटाचा रिमेक केला. त्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनीदेखील फार छान काम केलं. हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांना भरपूर आवडलं.” जुन्या आठवणींना उजाळा देत झीनत अमान यांनी ही पोस्ट लिहिली आहे.