चित्रपटनिर्माते सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. केरळमधील ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियात नेऊन ‘आयएसआयएस’मध्ये भरती करण्यात आल्याचा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. चित्रपटातील या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत. चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या प्रेक्षकांवर चित्रपटाची मुख्य अभिनेत्री चांगलीच भडकली आहे. तिने ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा-‘द केरला स्टोरी’ची दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
अदा शर्माने ट्विटरवर एक पोस्ट टाकत चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “काही लोक अजूनही ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत. अनेक भारतीय चित्रपटांची प्रशस्तिपत्रके पाहून असे प्रसंग अजिबात घडलेच नाहीत असे सांगत आहेत.”
अदाने अशा लोकांना विशेष विनंती केली आहे. ट्वीटमध्ये तिने लिहिले आहे की, ‘माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की, गुगलवर फक्त ISIS आणि Brides हे दोन शब्द टाईप करा. कदाचित गोर्या मुलींचे खाते असेल, ज्या तुम्हाला सांगू शकतील की, आमच्या भारतीय चित्रपटाची कथा खरी आहे.’
‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७.५ कोटींचा व्यवसाय केला होता, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १२.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बराच विरोध होत होता. त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिकाही कोर्टांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका याचिकेवर सुनावणी करताना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला.