‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. ५ मे रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांमध्ये १२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली असून तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘द केरला स्टोरी’ला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या उदंड प्रतिसादावर अदा शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून तुला काय वाटते, असा प्रश्न केल्यावर अदा शर्माने ‘एएनआय’शी बोलताना सांगितले की, “चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून मी खूप आनंदी आहे. मी कोणताही चित्रपट करताना हा माझा शेवटचा चित्रपट आहे असा विचार करते, कारण पुन्हा कधी संधी मिळेल की नाही?, माझ्या कामावर कोणी विश्वास दाखवील की नाही? याबाबत मला माहिती नसते.” एवढंच नाही तर चांगली संधी मिळण्यासाठी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील शाहरुख खानसारखा पुनर्जन्म घ्यावा लागेल का, असा विचार पूर्वी माझ्या मनात अनेकदा यायचा असेही अदा म्हणाली.
‘द केरला स्टोरी’बद्दलचे अनुभवही अदाने शेअर केले आहेत, अदा म्हणाली, जेव्हा चित्रपट बनण्यास सुरुवात झाली तेव्हा आम्हाला वाटले की यातून महिलांमध्ये जागृती होईल. ‘मला आनंद आहे की बरेच लोक हा चित्रपट पाहत आहेत आणि जे काही दडले होते त्याची वास्तविकता आता त्यांना कळली आहे.’ “कलाकार म्हणून नेहमीच लोकांनी आमचे काम पाहावे असे वाटते आणि अशी संधी मिळाली याचा मला आनंद असल्याचेही अदाने स्पष्ट केले