‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींची कमाई करेल. चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्माच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे. नुकतेच एका मुलाखतीत अदा शर्माने चित्रपटातील भूमिकेबाबत तिच्या कुटुंबीयांची नेमकी काय प्रतिक्रिया होती याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची २०० कोटींच्या दिशेने वाटचाल, १५ दिवसात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
डीएनएला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, अदा शर्माने चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत खुलासा केला आहे. अदा म्हणाली, “चित्रपटातील बलात्काराचा सीन बघून माझी आजी नेमकी कशी प्रतिक्रिया देईल याचा विचार करून मी घाबरले होते. माझी आजी शाळेत शिक्षिका होती. एवढेच नाही तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आहे.” अदा म्हणाली, जेव्हा तिच्या आजीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला तेव्हा तिला हा शैक्षणिक आणि माहितीपूर्ण अनुभव वाटला. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहावा, अशी तिची इच्छा होती.”
अदाने सांगितले की, जेव्हा तिने हा चित्रपट साइन केला होता, तेव्हा तिच्या आजी आणि आईला त्याची कथा सांगितली होती. अदा म्हणाली की, ती तिच्या आईला एका पीडितेला भेटण्यासाठी घेऊन गेली होती, जिच्यासोबतही अशीच गोष्ट घडली होती. अदा म्हणाली की, तिच्या कुटुंबाला या चित्रपटाबद्दल माहिती असूनही, तिची ९० वर्षांची आजी या चित्रपटावर कशी प्रतिक्रिया देईल याचा विचार करून ती घाबरली होती.