Bastar : The Naxal Story Teaser: विपुल अमृतलाल शाह, सुदीप्तो सेन व अदा शर्मा हे तिघे पुन्हा एकदा एकत्र आणखी एक धाडसी विषयावर बेतलेला चित्रपट लवकरच घेऊन आपल्यासमोर येणार आहेत. ‘द केरला स्टोरी’नंतर लगेचच काही दिवसात सुदीप्तो सेन यांनी आगामी ‘बस्तर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स अदा शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली होती. आता नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.
या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून ती आयपीएस अधिकारी नीरजा माधवन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. टीझरमध्ये अदा एक मिनिटं भाषण देताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाकिस्ताबरोबर युद्धात शहिद झालेले आपले जवान आणि आपल्याच देशात नक्षलवादी लोकांनी केलेली आपल्या जवानांची हत्या अन् जेएनयुसारख्या विद्यापीठात त्या कृतीचं सेलिब्रेशन अशा बऱ्याच गोष्टींबद्दल अदा शर्मा भाष्य करताना आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
‘द केरला स्टोरी’प्रमाणेच या चित्रपटातही निर्माते व दिग्दर्शक बऱ्याच गोष्टींचा दावा करताना दिसत आहेत. डाव्या वामपंथी लोकांची अन् त्यांच्या छुप्या अजेंड्याची पोलखोल या चित्रपटातून करण्यात येणार आहे असा दावाही याच्या निर्मात्यांनी टीझरमधून केला आहे. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनीच केले आहे अन् विपुल शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे.
प्रेक्षकांचा या टीझरला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अदा शर्मानेच हा टीझर सादर केला आहे. ‘द केरला स्टोरी’प्रमाणेच हा चित्रपटही संवेदनशील विषयावर बेतलेला असणार आहे. अद्याप अदा शर्माबरोबर यात आणखी कोणते कलाकार दिसणार आहेत याचा खुलासा झालेला नाही. हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ‘द केरला स्टोरी’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुदीप्तो सेन यांच्या या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत.