‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु असले तरीही या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘द केरला स्टोरी’ हा २०२३ मधील दुसरा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या १८ व्या दिवशी जादुई आकडा गाठत या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. याच निमित्ताने चित्रपटातील मुख्य अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांचे आभार मानत विशेष पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : भारतातील लोकप्रिय अभिनेता कोण? टॉप १० च्या यादीत केवळ तीन बॉलीवूड अभिनेते, शाहरुखला मागे टाकत…
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला म्हणून अभिनेत्री अदा शर्माने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यानिमित्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत अभिनेत्री म्हणाली, “भारतीय प्रेक्षकांचे मनापासून आभार… गेल्या काही दिवसांत मी चित्रपटाला शुभेच्छा देणारे अनेक पोस्टर्स, होर्डिंग्ज पाहिले आणि सगळ्यात महत्त्वाचे खास चित्रपट पाहण्यासाठी बंगालहून आसामपर्यंत प्रवास करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ सुद्धा पाहिले. ‘द केरला स्टोरी’ आता प्रेक्षकांचा सिनेमा असल्याने याच्या यशात मला सहभागी करुन घेण्यासाठी धन्यवाद…”
हेही वाचा : नयनताराने विकत घेतले ५३ वर्ष जुने थिएटर कारण…
अदा शर्मा पुढे म्हणाली, “केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्दा ‘द केरला स्टोरी’ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित झाला होता तसेच गेल्या काही दिवसांपासून मला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमधून प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे मेसेज येत आहेत. यामुळे मी खरंच आनंदी आहे.”
यापूर्वी अदा शर्माने ‘कमांडो २’ आणि ‘कमांडो ३’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. परंतु ‘द केरला स्टोरी’मुळे अदा शर्माला एक वेगळी ओळख निर्माण झाली. यामध्ये अदासह योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.