चिंता, डिप्रेशन यावर अनेक बॉलिवूड स्टार खुलेपणाने बोलत असतात. अनेकांनी याचा सामनाही केला आहे, त्यामुळे त्यांच्या करिअरवरही परिणाम झाला. बरेच कलाकार आपले अनुभव शेअर करत असतात. नुकतेच अभिनेता अध्ययन सुमनने त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत खुलासा केला आहे. आत्महत्येचे विचारही मनात यायचे असं तो म्हणाला.
हेही वाचा – “मार खाऊ शकता” म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मी इतकंच म्हणेन…”
“मी स्वतः डिप्रेशनच्या ट्रॉमामध्ये बराच काळ जगलो आहे. मला माझे आईवडील आणि मित्रांनी वाचवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एक काळ असा होता की मी स्वतःला मारण्याचा विचार करायचो. तासन् तास मी बेडवर पडून पंख्याकडे एकटक पाहत असायचो. असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये. माझ्यासाठी सर्व काही संपलं आहे. ज्याने इतकं दमदार पदार्पण केलं, ज्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, गाणी अजूनही लोकांच्या ओठावर आहेत, तरीही काम मिळत नाही, या सर्व गोष्टींचा मला इतका त्रास होऊ लागला की मी स्वतःलाच इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करायचो,” असं अध्ययन म्हणाला.
मित्रांना श्रेय देत अध्ययन पुढे म्हणाला, “त्यावेळी माझ्या मित्रांनी मला खूप मदत केली. ते रोज माझ्या घरी यायचे आणि फक्त माझं ऐकायचे. तुमच्या आयुष्यात कोणीतरी असावं जो फक्त तुमचं ऐकतो आणि ज्याच्या समोर तुम्ही तुमच्या मनातलं विष बाहेर काढू शकता. त्यांच्याशी बोलून मला खूप मोकळं वाटायचं. अर्थात डॉक्टरही होते पण माझ्या मित्रांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलं आहे. त्यावेळी पालकांचाही खूप सपोर्ट होता.”
“२०१० नंतर मला १२ चित्रपट मिळाले होते, ते सर्व चित्रपट माझ्या हातातून गेले, त्यामुळे मला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला. यातून बाहेर पडायला खूप वेळ लागला, पण शेवटी मी या सर्व समस्यांवर मात केली आणि आता नव्या जोमाने काम करत आहे,” असं अध्ययनने सांगितलं.