शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा बाजीगर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शाहरुख खानसह काजोल, शिल्पा शेट्टी, जॉनी लिव्हर यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. चार कोटींच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३२ कोटींची कमाई केली होती. अभिनेता आदि इराणीदेखील या चित्रपटात अभिनय करताना दिसला होता. या चित्रपटात अभिनेत्याने विकी मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गाजलेल्या चित्रपटात काम करूनही एक वेळ अशी आली होती की, त्याच्याकडे मुलीसाठी दूध घेण्यासाठी पैसे नव्हते, असा खुलासा अभिनेत्याने केला आहे.

अभिनेत्याने नुकतीच ‘फिल्मीतंत्रा मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत १९९३ साली अनाडी आणि त्याच वर्षी बाजीगर अशा चित्रपटात केले होते. मात्र, त्यानंतर कुटुंबाच्या गरजा पुरतील इतके पैसे नव्हते, असा खुलासा अभिनेत्याने केला आहे. आदि इराणीने म्हटले, “१९९५ साली माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला. त्यावेळी दुधाची किंमत ५ रुपये होती. काही वेळा माझ्याकडे तितकेदेखील पैसे नसायचे. प्रत्येक दिवशी मी शहरात जायचो, लोकांकडे काम मागायचो. मी माझ्या मित्राची स्कूटर घेतली होती. कधी कधी त्यामध्ये पेट्रोल भरण्याचेदेखील पैसे नसायचे.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मला पेट्रोल विकत घेणे परवडत नव्हते. त्या दिवसांत मी बसस्टॉपपर्यंत चालत जायचो. लोक मला विचारायचे की, तू बसस्टॉपवर काय करतोयस? मी त्यांच्याशी खोटे बोलायचो. त्यांना सांगायचो की, मी माझ्या मित्राची वाट पाहत आहे. माझ्या घरी फोनही नव्हता. जवळच एक पीसीओ बूथ होता. तिथला मुलगा मी मेसेज पाठविण्याचा एक रुपया घेत असे आणि जर माझ्यासाठी कोणाचा मेसेज आला, तर त्याचाही एक रुपया घेत असे. माझ्याकडे पैसे नसल्याने मी अनेक भूमिकांना होकार दिला होता.

प्रसिद्ध अभिनेत्री व बहीण अरुणा इराणी यांना तुमच्या या आर्थिक परिस्थितीबद्दल माहीत होते का? यावर बोलताना अभिनेत्याने म्हटले की, माझ्या बहिणीला माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहीत होते. तिने अनेक वेळा मला मदत करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र, मी तिची मदत घेण्यास नकार दिला होता. मी तिचा भाऊ आहे; पण याचा अर्थ असा नाही की, तिने माझी जन्मभर काळजी घेतली पाहिजे. तो माझा संघर्ष होता आणि तिला काळजी घेण्यासाठी तिचे स्वत:चे कुटुंब आहे.

दरम्यान, पुढे अभिनेत्याला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी पत्नीने मोठी साथ दिली, मदत केली, अशीही प्रतिक्रिया त्याने दिली. माझ्या पत्नीच्या मदतीशिवाय मी या परिस्थितीतून बाहेर पडणे अशक्य होते. आमचा प्रेमविवाह झाला आहे. कधी कधी मला पत्नीकडे पाहून वाईट वाटायचे की, तीही माझ्याबरोबर या परिस्थितीत अडकली आहे, या शब्दांत आदि इराणीने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader